होळीपूर्वीच रंगणार गुणवत्तेचा रंगोत्सव, एससीईआरटीचे आयोजन
By अविनाश साबापुरे | Published: March 15, 2024 04:12 PM2024-03-15T16:12:37+5:302024-03-15T16:14:21+5:30
आता निवड झालेल्या शाळांना आठ विद्यार्थी आणि दोन शिक्षक अशी चमू या रंगोत्सवात पाठवावी लागणार आहे.
यवतमाळ : होली के दिन दिल खिल जाते हैं.. रंगो मे रंग मिल जाते हैं... पण यंदा शिक्षण विभाग होळीच्या आठवडाभरापूर्वीच ‘रंगोत्सव’ साजरा करणार आहे. हा रंगोत्सव नुसता रंगांचा नव्हेतर शैक्षणिक उपक्रमांचा आणि नवनव्या अध्ययन-अध्यापन प्रयोगांचा राहणार आहे.
येत्या १८ आणि १९ मार्च रोजी दोन दिवस पुणे येथे होणाऱ्या या ‘रंगोत्सव’ उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यभरातील शाळांकडून व्हीडिओ स्वरुपात प्रस्ताव मागविले होते. त्यातून उत्तम प्रयोगांची या रंगोत्सवाकरिता निवड करण्यात आली आहे. आता निवड झालेल्या शाळांना आठ विद्यार्थी आणि दोन शिक्षक अशी चमू या रंगोत्सवात पाठवावी लागणार आहे. याबाबत एससीईआरटीच्या उपसंचालक डाॅ. माधुरी सावरकर यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी कळविले आहे. संबंधित शिक्षकांना विद्यार्थ्यांसह रंगोत्सवात सहभागी होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. रंगोत्सवात उत्कृष्ट ठरणाऱ्या शाळांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे.
- कशाचे होणार सादरीकरण?
या रंगोत्सवात राज्यातील तिसरी ते आठवीचे विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांसह सहभागी होतील. अध्ययन-अध्यापनात विशिष्ट कृतींचा समावेश केल्यास शिक्षण प्रक्रिया कशी प्रभावी होऊ शकते, याचे सादरीकरण या रंगोत्सवात केले जाणार आहे. सादरीकरणासाठी १० मिनिटे दिली जातील. यामध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, आर्ट इंटीग्रेटेड लर्निंग, स्पोर्ट इंटिग्रेटेड लर्निंग, स्टोरी टेलिंग, काॅम्पीटेंन्सी बेस्ड लर्निंग या पाच विषयावर सादरीकरण करावे लागणार आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेला ‘नकाशा वाचन’ उपक्रमासाठी बाेलावण्यात आले आहे.
या शाळांना आलेय रंगोत्सवाचे निमंत्रण
जवाहर विद्याभवन, मुंबई, मलनाथपूर जि.प.शाळा, बीड, मराठी विद्यामंदिर वरगाव, कोल्हापूर, शिरगाव जि.प.शाळा, सांगली, एसव्हीएम पब्लिक स्कूल, ठाणे, भिंदोन जि.प.शाळा, छत्रपती संभाजीनगर, बडंगखस्ती जि.प.शाळा, अहमदनगर, सातघरी जि.प.शाळा, नांदेड, पाडळी जि.प.शाळा, बुलडाणा, टेन मराठी जि.प.शाळा, पालघर, गुळबंजी जि.प.शाळा, सोलापूर, मांजरी जि.प.शाळा, अकोला, वांगुले जि.प.शाळा, रत्नागिरी, सेंट झेव्हीयर हायस्कूल मुंबई, शारदा विद्यालय कळमसर जळगाव, महाजन हायस्कूल तळोदा, नंदूरबार, उदय प्राथमिक शाळा उदगीर, लातूर, सुकळी जि.प.शाळा, यवतमाळ, बांद्रा जि.प.शाळा, नागपूर, पिंपळगाव जि.प.शाळा, परभणी, आनंदीबाई सरनोबत हायस्कूल कोल्हापूर, विसोरा जि.प. कन्याशाळा, गडचिरोली, मठपिंप्री जि.प.शाळा, अहमदनगर.