नवीन मशीन मिळणार; पण जूनपर्यंत वाट पहा, एसटी वाहकांची होणार त्रासातून मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 11:52 AM2023-04-15T11:52:59+5:302023-04-15T11:54:45+5:30
३४ हजारांचा लॉट येणार
यवतमाळ : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळातील वाहकांच्या डोक्याला ताप ठरलेल्या जुन्या तिकीट इश्यू मशीन हद्दपार होऊन त्या जागी आता नवीन इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन दिल्या जाणार आहेत. येत्या जून महिन्यात कंपनीकडून महामंडळाला ३४ हजार नवीन मशीन पुरविल्या जाणार आहेत. यामुळे वाहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ट्रायमॅक्स या कंपनीकडे राज्यातील सर्व आगारांना इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन पुरविण्याचे कंत्राट होते. परंतु निकृष्ट दर्जाची बॅटरी, बटण काम न करणे, तिकिटांची रक्कम मशीनमध्ये दाखवणे मात्र तिकीट छपाई न होणे, चुकीचे तिकीट येणे आदी प्रकारच्या तक्रारी अल्पावधीतच वाहकांकडून सुरू झाल्या. त्यामुळे या मशीन कायम चर्चेत राहिल्या. या मशीन दुरुस्तीसाठी एसटीने वारंवार ट्रायमॅक्स कंपनीशी संपर्क साधला. परंतु काहीही फायदा झाला नाही. सदोष मशीनमुळे गर्दीत कोऱ्या कागदावर तिकीट लिहून देण्याची कसरत वाहकांना करावी लागते. वाहकांची हीच गैरसोय दूर करण्यासाठी महामंडळाने इबिक्सकॅश या कंपनीकडून हार्डवेअर आणि मशिन्स घेण्याबाबत नवीन करार केला आहे.
जुन्या १८ हजार मशीन बंद
महामंडळाच्या ताफ्यात एकूण ३८ हजार ५३३ मशीन आहेत. यापैकी ४२ टक्के अर्थात १८ हजार मशीन बंद आहेत. मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, बीड, लातूर, नांदेड, परभणी, जळगाव, अहमदनगर, वर्धा, गडचिरोली, अकोला आणि बुलढाणा आदी विभागातील निम्म्याहून अधिक मशीन बंद आहेत.
तिकीट मशीनकरिता नवीन कंपनीसोबत करार झाला आहे. येत्या जून महिन्यात या मशीन वाहकांकडे असतील. यामुळे वाहकांची जी गैरसोय होत होती, ती होणार नाही.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी
कर्मचाऱ्यांना कापड की रोख...
महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळातील चालक, वाहक, यांत्रिक कर्मचाऱ्यांना गणवेश दिला जातो. परंतु, मागील चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे गणवेशाशिवाय कामगिरीवर आल्यास कारवाईचा धाक आहे. यातूनही कामगारवर्गाची मुक्तता होणार आहे. फक्त आता कापड द्यायचे, की गणवेशाची रक्कम रोखीने द्यायची, यावर महामंडळ प्रशासनात खल सुरू आहे. याआधी कामगारांना गणवेश शिवून देण्यात आला होता. याविषयी कर्मचाऱ्यांमध्ये विविध कारणांवरून नाराजीचा सूर होता. त्यामुळे आता कापड किंवा रोख रक्कम मिळेल, अशी सूत्रांची माहिती आहे.