मोख-आरंभी परिसरात गावठी दारूचा महापूर
By admin | Published: April 17, 2017 12:26 AM2017-04-17T00:26:48+5:302017-04-17T00:26:48+5:30
राज्य मार्गावरील देशी-विदेशी दारूची दुकाने हटविल्यानंतर आता ग्रामीण भागात गावठी दारू गाळण्याचा धंदा तेजीत आला आहे.
प्रशासन अनभिज्ञ : गावागावात खुलेआम विक्री, हायवेवरील दारूबंदीचा परिणाम
दिग्रस : राज्य मार्गावरील देशी-विदेशी दारूची दुकाने हटविल्यानंतर आता ग्रामीण भागात गावठी दारू गाळण्याचा धंदा तेजीत आला आहे. तालुक्यातील मोख, आरंभी परिसरात तर गावठी दारूचा महापूर वाहत आहे. गावात दारूची खुलेआम विक्री होत असताना कुणीही त्यावर नियंत्रण आणत नाही.
तालुक्यातील मोख-आरंभी सर्कलमध्ये २० ते २५ गावांचा समावेश होतो. या गावांमध्ये काही दिवसांपासून खुलेआम दारू गाळली जात आहे. या व्यवसायात अनेक जण उतरले असून गावालगतच्या नदी-नाल्यावर दारू गाळली जाते. अनेक जण दारूच्या आहारी गेले असून काही गावातील महिला मंडळांनी दारूबंदीचा प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नाही. आता तर राज्य मार्गावरील दारू दुकाने बंद झाल्याने दारूड्यांचा मोर्चा गावातील हातभट्टी दारुकडे वळला आहे. गावागावात खुलेआम दारू विकली जात आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बीट जमादारांना माहीत असतो. परंतु अर्थपूर्ण व्यवहारामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे प्रत्येक गावातील दारू विक्रेत्यांची नावे पोलिसांना माहीत असतात. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. (शहर प्रतिनिधी)