शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याचा ‘मुहूर्त’ हुकला

By admin | Published: August 19, 2016 01:14 AM2016-08-19T01:14:06+5:302016-08-19T01:14:06+5:30

दरवर्षी राज्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

'Muhurta' hukla to announce teacher award | शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याचा ‘मुहूर्त’ हुकला

शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याचा ‘मुहूर्त’ हुकला

Next

आॅनलाईन प्रस्ताव मागविले : कामाचे सादरीकरण व मुलाखतीनंतरच होणार निवड
हरसूल : दरवर्षी राज्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. शिक्षकदिनी खास समारंभाचे आयोजन करून हे पुरस्कार वितरीत केले जातात. आतापर्यंतच्या या पुरस्काराच्या परंपरेप्रमाणे स्वातंत्र्य दिनी या पुरस्काराची घोषणा करून शिक्षकदिनी त्याचे वितरण केले जाते. यंदा मात्र पुरस्काराची घोषणा अजूनही व्हायची असल्याने राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याचा मुहूर्त हुकल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.
राज्य शिक्षक पुरस्कारासाठीची निवड प्रक्रियाच अजून सुरू आहे. त्यामुळे निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर करता आली नसल्याचे शिक्षण विभागातील एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले. यंदा प्रथमच राज्य शिक्षक पुरस्काराची निवड प्रक्रिया पूर्णत: बदलली आहे. बदलेल्या प्रक्रियेप्रमाणे आवश्यक ते बदल समजून त्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करण्यास उशीर होत असल्याने एकूण संपूर्ण कार्यक्रमास वेळ लागत असल्याचे समजते.
यावर्षी पहिल्यांदाच पुरस्कारासाठी आॅनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियाच नव्याने घेण्यात आली येत आहे. सध्या विभागीय स्तरावर शिक्षकांच्या मुलाखती आटोपल्या असून राज्य स्तरावरील मुलाखती व कामाचे सादारीकरण २० आॅगस्ट पासून पुण्यात होणार आहेत. त्यानंतर शिक्षकांचे मूल्यांकन पूर्ण होईल. मेरीट नुसार निवड झालेल्या शिक्षकांची नावे त्यानंतरच जाहीर केली जातील. ही प्रक्रिया पूर्ण होण्याला एक ते दोन आठवडे लागू शकतील असा अंदाज या प्रक्रियेत सहभागी अधिकारी व्यक्त करीत आहेत. संपूर्ण पारदर्शक व वस्तुनिष्ठ पद्धतीने ही निवड प्रक्रिया होत असल्याचे निरीक्षणही काही अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केले. यापूर्वी शिक्षकांना विहित निकषां प्रमाणे आपला प्रस्ताव तयार करून तो जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावा लागत होता. समिती या प्रस्तावावर विचार करून पहिले तीन प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठवीत असे. राज्यस्तरावर या प्रस्तावांचे मुल्यांकन होवून त्यापैकी एक प्रस्ताव राज्य पुरस्कारासाठी निवडला जात असे. आता जिल्हा स्तरावरील समिती गुंडाळण्यात आली असून विभागस्तरावर समिती आॅन लाईन आलेल्या माहितीचे सूक्ष्म अवलोकन करून दिलेल्या निकषाच्या आधारावर तपासणी करते. त्यातून पहिल्या दोन प्रस्तावांना राज्यस्तरावर मुलाखत व सादरीकरण करण्याची संधी दिली जाते. त्यानंतर पुरस्कार पात्र शिक्षकांच्या नावाची घोषणा केली जाते. यंदा पहिल्यांदाच हे सर्व बदल झाल्याने पुरस्कार जाहीर होण्यास उशीर होत आहे. असे असले तरी पुरस्कार वितरण मात्र शिक्षक दिनीच होईल असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: 'Muhurta' hukla to announce teacher award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.