नळजोडण्या मंजुरीत ‘मजीप्रा’ची दिरंगाई

By admin | Published: August 4, 2016 01:02 AM2016-08-04T01:02:54+5:302016-08-04T01:02:54+5:30

नवीन नळजोडण्या स्वस्त झाल्याने वंचित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील....

Mujipra's delayed acceptance of nodding | नळजोडण्या मंजुरीत ‘मजीप्रा’ची दिरंगाई

नळजोडण्या मंजुरीत ‘मजीप्रा’ची दिरंगाई

Next

अर्जदार त्रस्त : पाण्याची बिलेही काढली जात नाही
यवतमाळ : नवीन नळजोडण्या स्वस्त झाल्याने वंचित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जोडण्या मंजूर करण्यात दिरंगाई सुरू केली आहे. हा प्रकार नागरिकांच्या संतापात भर पाडणारा ठरत आहे. आधीच्या अर्जदारांना नंतर आणि नंतरच्या अर्जदारांना आधी जोडण्या देण्याचे प्रकार घडत असल्याचेही सांगितले जाते. कार्यकारी अभियंता या बाबीकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
उन्हाळ्यात नळजोडण्या देणे बंद केले जात होते. यावर्षी यवतमाळ शहरात कधी नव्हे तेवढा पाणीप्रश्न गंभीर झाला होता. तब्बल आठ दिवसानंतर नागरिकांना पाणी मिळत होते. असे असतानाही नळजोडण्या देण्याचे सौजन्य या विभागाने दाखविले. पण नवीन नळजोडण्या देण्यात आणि होत असलेल्या दुजाभावाने या सौजन्याची पार वाट लावली गेली आहे. फेबु्रवारी महिन्यात अर्ज करूनही नळजोडणी मिळाली नसल्याची तक्रार वंचितांची आहे.
वारंवार चकरा मारूनही अर्जावर निर्णय घेतला जात नाही. अर्जात काही त्रुटी आहेत काय, कागदपत्र कमी आहे काय, काही रक्कम भरावी लागते काय, अशी विचारणा संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केल्यास स्पष्टपणे सांगितले जात नाही. अर्जही मागे पडते. यामागील कारण स्वत: अर्जदारालाच शोधावे लागते. शाखा अभियंता, उपअभियंता ही अनुभवी मंडळी नळ जोडण्या मंजुरीचे काम सांभाळतात. या विभागात लिपिकांचा तुटवडा असल्याने एका कर्मचाऱ्याला त्यांच्या मदतीला देण्यात आले आहे. तरीही अर्ज निकाली काढण्यात विलंब होत आहे. जाणीवपूर्वक अडवणूक तर होत नाही ना, अशीही शंका यानिमित्ताने उपस्थित केली जात आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आर्थिक अडचणीत आहे, असे सांगितले जाते. हातावर आणून पानावर खाण्याची वेळ प्राधिकरणावर आली आहे. वसुली वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र दुसरीकडे नवीन नळजोडणीधारकांना कित्येक महिनेपर्यंत बिलच दिले जात नाही. पाण्याचा प्रत्यक्ष होत असलेला पुरवठा आणि देयकाची रक्कम यात बरीच तफावत आहे. पाणी चोरीच्या नावाखाली हे सर्व चालवून घेतले जात आहे. कार्यकारी अभियंत्यांनी यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी आहे.
नळ जोडण्या स्वस्त झाल्याने काही थकीत ग्राहकांकडून दुसऱ्या नावाने अर्ज केला जाऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी काही शक्यता पडताळण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ग्राहकांच्या याद्या संगणकीकृत आहेत. त्याची गांभीर्याने तपासणी केल्यास या बाबी लक्षात येऊ शकतात. शिवाय प्रत्यक्ष नळजोडणी देताना पाईपलाईनवरही हा प्रकार निदर्शनास येऊ शकतो. मात्र यासाठी इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे सांगितले जाते. (वार्ताहर)

कमी दाबाने पाणीपुरवठा
यवतमाळ शहरातील अनेक भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. शुक्रवार आणि सोमवारी नळाचा दिवस असलेल्या काही भागातील नागरिकांना नळ येऊन गेल्याचा पत्ताही लागला नाही. याविषयी चौकशी केली असता कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची बाब समोर आली. वडगाव रोड, दारव्हा रोड परिसरात हा प्रकार घडत आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले असल्याने नागरिकांना नियमित आणि शुध्द पाणी मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले जात आहे. वितरणातील दोष दूर करून होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी आहे.

 

Web Title: Mujipra's delayed acceptance of nodding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.