मुकुटबन पोलिसांचा चक्क आदिलाबादमध्ये ‘फेरफटका’

By Admin | Published: February 27, 2015 01:39 AM2015-02-27T01:39:21+5:302015-02-27T01:39:21+5:30

यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन पोलीस फेरफटका मारण्यासाठी महिन्यातून अनेकदा तेलंगण राज्यातील आदिलाबादला जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Mukutaban police, 'Tour' in Adilabad | मुकुटबन पोलिसांचा चक्क आदिलाबादमध्ये ‘फेरफटका’

मुकुटबन पोलिसांचा चक्क आदिलाबादमध्ये ‘फेरफटका’

googlenewsNext

बी.संदेश आदिलाबाद
यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन पोलीस फेरफटका मारण्यासाठी महिन्यातून अनेकदा तेलंगण राज्यातील आदिलाबादला जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
वास्तविक पोलिसांना तपासासाठी जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर पोलीस अधीक्षकांची आणि राज्याबाहेर जायचे असेल तर किमान विशेष पोलीस महानिरीक्षकांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र मुकुटबन पोलीस कुणाचीही परवानगी न घेता आणि अनेकदा ठाणेदारालाही अंधारात ठेवून थेट आदिलाबादमध्ये फेरफटका मारण्यासाठी जात असल्याचे आढळून आले आहे. विनाकारण शासकीय वाहनाचा होणारा हा वापर रोखणार कोण, हा मुख्य प्रश्न आहे. अर्थात मुकुटबन ठाण्याच्या पोलीस जीपचे लॉगबुकही संशयास्पद असावे, बोगस पद्धतीने ते भरले जात असावे, असे दिसते. पोलीस वाहनांवर जीपीआरएस सिस्टीम अशाच भानगडी रोखण्यासाठी लावण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र मुकुटबन ठाण्याच्या या जीपला ही जीपीआरएस सिस्टीम लागलेली नाही. त्याचाच फायदा काही पोलीस कर्मचारी उठवित असल्याचे दिसून येते.
दोन दिवसांपूर्वी आदिलाबाद बसस्थानक परिसरात यवतमाळ जिल्ह्यातील पोलिसांचे बोलेरो वाहन (एम.एच.२९/एम-९६१२) फिरताना आढळून आले. या वाहनात एक पोलीस अधिकारी, महिला पोलीस शिपाई व चालक दिसून आला. एखाद्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात हे वाहन आले असावे, या हेतूने यासंदर्भात आदिलाबाद पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी देखील याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे पत्रकारांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला असता हे पथक कोणत्याही तपास किंवा आरोपीच्या शोधात आले नसून केवळ फेरफटका मारण्यासाठी शहरात आल्याचे सांगण्यात आले. या पथकाने आदिलाबाद पोलिसांशीदेखील कोणताही संपर्क केला नव्हता. अनेकदा हे पथक केवळ फिरण्यासाठी आदिलाबादमध्ये येत असल्याचेही काहींनी सांगितले. शासकीय वाहनाचा गैरवापर व कर्तव्याला बगल देवून केवळ फेरफटका मारणाऱ्यांवर वरिष्ठ काही कारवाई करतात का याकडे आदिलाबादकरांचे लक्ष लागले आहे.
सदर प्रतिनिधीने यवतमाळ पोलीस मुख्यालयात चौकशी केली असता सदर क्रमांकाचे वाहन मुकुटबन पोलीस ठाण्याचे असल्याचे निष्पन्न झाले. मुकुटबनपासून तेलंगणची हद्द अगदी जवळ आहे. त्यामुळेच सीमावर्ती भागातील पोलीस अनेकदा आदिलाबादमध्ये जातात. कित्येकांचे तर व्यवहार, खरेदीसुद्धा आदिलाबादमध्ये आहे. मुकुटबनप्रमाणेच वणी व पांढरकवडा विभागातील अन्य सीमावर्ती ठाण्यातील पोलीस वाहनेही अशाच पद्धतीने नियमबाह्यरीत्या केवळ फेरफटका मारण्यासाठी आदिलाबादमध्ये जात असावी, असा संशय येथे व्यक्त केला जात आहे.

Web Title: Mukutaban police, 'Tour' in Adilabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.