मुंबई, पुणे एसटी रिकामीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 05:00 AM2021-03-25T05:00:00+5:302021-03-24T23:30:03+5:30
संपूर्ण राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासोबतच प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अनेकांनी बाहेरगावी जाणे थांबविले आहे. अत्यंत आवश्यकता असेल, तरच प्रवासी बाहेरगावी जाताना दिसतात. यामुळे परिवहन महामंडळानेही ज्या ठिकाणी प्रवासी दिसतील अशाच बसफेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. यवतमाळ शहरातून दरदिवशी १० हजार प्रवासी बाहेरगावी जात होते, आता ही संख्या कमालीची कमी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दररोज हजारो प्रवाशांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे काम करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. खासकरून मुंबई आणि पुणेच्या बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. याचा फटका एसटीच्या उत्पन्नाला बसला आहे.
संपूर्ण राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासोबतच प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अनेकांनी बाहेरगावी जाणे थांबविले आहे. अत्यंत आवश्यकता असेल, तरच प्रवासी बाहेरगावी जाताना दिसतात. यामुळे परिवहन महामंडळानेही ज्या ठिकाणी प्रवासी दिसतील अशाच बसफेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. यवतमाळ शहरातून दरदिवशी १० हजार प्रवासी बाहेरगावी जात होते, आता ही संख्या कमालीची कमी झाली आहे. यवतमाळातून ७० बसफेऱ्यांचे शेड्युल होते. हे शेड्युल आता कमी होत आहे. ॲडव्हान्स बुकिंग थांबली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार बदल झाले आहेत. यामुळे अशा ठिकाणच्या बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नंदुरबार या ठिकाणी प्रवासी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अशा ठिकाणांची काही शेड्युल बंद केली आहेत.
७० बसेस रोज
जिल्हा मुख्यालयातून विविध मार्गांवर जाणाऱ्या ७० बसेसचे शेड्युल सध्या कार्यान्वित आहे. यामध्ये ग्रामीण भागासह शहरी भागाचाही समावेश आहे.
सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या कमी करण्यात आल्या आहेत. या मार्गावर जाण्यासाठी प्रवासी तयार नाहीत. यामुळे अशा बससेवा सध्याच्या स्थितीत बंद करण्यात आल्या आहे. यामध्ये पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा गाड्यांचा समावेश आहे.
रातराणी सेवा बंद
दिवसा धावणाऱ्या बसगाड्यांनाच पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. मग, संध्याकाळी जाणाऱ्या गाड्यांना कुठून प्रवासी मिळणार, असा प्रश्न एसटीपुढे उभा झाला आहे. यातून लांब पल्ल्याच्या रातराणी बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. पूर्वस्थिती निर्माण होईपर्यंत या गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत.
नो वेटिंग
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रवासी संख्या कमी होत चालली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी पूर्वी आरक्षण बुकिंग होत होते. आता जाणारे प्रवासीच नसल्याने प्रत्येकाला गाडीमध्ये जागा उपलब्ध होते. यातून एसटी बसमध्ये नो वेटिंग असा प्रकार पाहायला मिळत आहे. यात एसटीचे उत्पन्न मात्र घटले आहे.
जिल्ह्यात लांब पल्ल्याच्या आणि मध्यम पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवासी संख्या घटली आहे. यामुळे परिवहन महामंडळाने अनेक फेरबदल केले आहेत. ज्या ठिकाणी उत्पन्न आहे, अशाच ठिकाणी बसफेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. इतर बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. यातून महामंडळाच्या वेळापत्रकातही बदल झाले आहेत.
- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली
कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे. विदर्भामध्ये नागपूरपाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यात रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमालीची घटली आहे. परिस्थिती चांगली होईपर्यंत प्रवासी संख्या वाढण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या आहेत.