कोरोनाविरुद्ध मुंगशी गावकऱ्यांचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:42 AM2021-04-24T04:42:51+5:302021-04-24T04:42:51+5:30

पुसद : तालुक्यातील मुंगशी येथील ग्रामस्थांनी शासनाची वाट न बघता काेरोनाविरुद्ध लढण्याची तयारी सुरू केली. गावकऱ्यांना मोफत औषधीसह विलगीकरणाचीही ...

Mungashi villagers fight against Corona | कोरोनाविरुद्ध मुंगशी गावकऱ्यांचा लढा

कोरोनाविरुद्ध मुंगशी गावकऱ्यांचा लढा

Next

पुसद : तालुक्यातील मुंगशी येथील ग्रामस्थांनी शासनाची वाट न बघता काेरोनाविरुद्ध लढण्याची तयारी सुरू केली. गावकऱ्यांना मोफत औषधीसह विलगीकरणाचीही सुविधा उपलब्ध करून दिली. यातून ‘गाव करी ते राव ना करी’, याचा प्रत्यय आला.

कोरोनाची दुसरी लाट आक्रमकतेने पसरत आहे. शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही उद्रेक वाढत आहे. मागील वर्षी मुंगशी येथे एकही रुग्ण नव्हता. मात्र, या वर्षी अनेकांना बाधा झाली. कोरोनाबद्दल ठोस माहिती उपलब्ध नसली, तरी बाधा होऊ न देणे किंवा झालीच तर त्वरित स्वतः विलगीकरण करून उपचार घेणे, या बाबी सर्वमान्य आहे. उपचारात दिरंगाई झाल्यास महत्त्वाच्या अवयवांना गंभीर संसर्ग होऊन थेट रुग्णालयात भरती व्हावे लागते.

सध्या शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना बेड उपलब्ध नाही. त्यावर ऑक्सिजन, रेमडेसिविर आदींचा तुटवडा आहे. बेड उपलब्ध झाले तरी गरीब रुग्णांना खासगीत महागडे उपचार परवडण्यासारखे नाहीत. या सर्व बाजूंची चर्चा मुंगशीचे गावकरी, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी केली. खबरदारी, लवकर निदान, प्रतिबंधात्मक औषधी आणि विलगीकरण या मुख्य मुद्द्यांना अनुसरून गाव पातळीवरच उपाययोजना करण्यावर त्यांचे एकमत झाले.

शासकीय मदत व परवानगीसाठी अधिकारी स्तरावर प्रयत्न करण्यात वेळ गेला. पण काहीच लाभ झाला नाही. नंतर गावकऱ्यांनीच एकमताने व स्वयंस्फूर्तीने कोरोनाशी दोन हात करायचे ठरविले. ग्रामपंचायत सदस्यांनी चोंढी येथील आरोग्य यंत्रणेला संपर्क केला. गावात आरटीपीसीआर चाचणी शिबिर घेण्याची विनंती केली. गावात जनजागृती करून चाचणी करून घेण्यास प्रवृत्त केले.

चोंढीचे डॉ. विशाल चव्हाण व त्यांची चमू शुक्रवारी गावात आली. त्यांना प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी १३२ लोकांनी चाचणी करून घेतली. चाचणी साहित्य संपल्यामुळे ही प्रक्रिया उद्याही सुरू ठेवण्यात येईल. अहवाल किंवा शासकीय मदतीची वाट न पाहता गाव पातळीवरच प्राथमिक औषधींची अद्ययावत किट तयार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने गावातील नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिली.

या उपक्रमात सरपंच अमेय चव्हाण, पोलीस पाटील उमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य दिनेश पवार, पृथ्वीराज चव्हाण, मिथुन चव्हाण, सहकारी अविनाश चव्हाण, कैलास गरडे, अजय चव्हाण, बाळू पवार, विजय राठोड, नीलेश पवार व गावकऱ्यांनी मेहनत घेतली.

बॉक्स

रुग्णांसाठी गावाबाहेर विलगीकरण व्यवस्था

एखाद्याचे अहवाल पाॅझिटिव्ह आले व शासनाकडून गृहविलगीकरणाचा सल्ला मिळाला, अशा व्यक्तींना दाट वस्तीत न ठेवता त्यांच्या राहण्यासाठी गावाबाहेरील सार्वजनिक ठिकाण स्वच्छ व सॅनिटाइझ करून तेथे विलगीकरणाची व्यवस्था केली जाणार आहे. गावकऱ्यांनी एकत्रित येत हा निर्णय घेतला. यातून त्यांनी एकीचे बळ दाखवून दिले.

Web Title: Mungashi villagers fight against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.