पूस नदीपात्रात पालिकेची सफाई मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 09:59 PM2017-12-04T21:59:56+5:302017-12-04T22:00:14+5:30
आॅनलाईन लोकमत
पुसद : अपुऱ्या पावसामुळे यंदा पुसदकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुसद नगरपरिषदेने विविध उपक्रम हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणजे जलशुद्धीकरण केंद्राजवळील पूस नदीवरील बंधाऱ्याची साठवण क्षमता वाढविणे होय. त्यासाठी सफाई मोहीम हाती घेण्यात आली असून गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊस झाला. त्यामुळे या धरणात केवळ १५-२० टक्केच पाणीसाठा आहे. जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता नगरपरिषदेने दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. परंतु त्यानंतरही धरणातील पाणी आटले तर काय? म्हणून पूस नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पूस धरणातून पुसदकरांना पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पाणी सोडल्यानंतर पूस नदीतून ते जलशुद्धीकरण केंद्राच्या बंधाऱ्यात अडविले जाते. हा बंधारा पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. उन्हाळ्यात पाणीपुरवठा कसा होईल, या दृष्टीने नगराध्यक्ष अनिता नाईक, पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांच्या पुढाकारात पूस नदी स्वच्छता मोहीम व बंधाऱ्यातील गाळ काढून खोलीकरण, रुंदीकरण आदी कामांना प्रारंभ केला आहे. तीन जेसीबी मशीन व मजुरांच्या माध्यमातून या बंधाºयाची साठवण क्षमता वाढविणार आहे. पूस धरणातून महिन्यात एकदा नदीत पाणी सोडावे लागेल. एक महिना साठवण केलेले पाणी पुसदकरांना पुरवठा करता येईल. वारंवार धरणातून पाणी सोडल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत होता. आता त्याला आळा बसणार व पाण्याची बचत होवून उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरेल, असा आशावाद व्यक्त केला आहे.