पाण्यासाठी नगरसेवक जिल्हा कचेरीच्या टॉवरवर

By admin | Published: June 3, 2016 02:30 AM2016-06-03T02:30:19+5:302016-06-03T02:30:19+5:30

शहरातील पाणी प्रश्नावरून काँग्रेसचे नगरसेवक अमन निर्बाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून गुरुवारी वीरूगिरी केली.

To the municipal corporation's district tower | पाण्यासाठी नगरसेवक जिल्हा कचेरीच्या टॉवरवर

पाण्यासाठी नगरसेवक जिल्हा कचेरीच्या टॉवरवर

Next

दोन तास ठिय्या : वीरूगिरी आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ
यवतमाळ : शहरातील पाणी प्रश्नावरून काँग्रेसचे नगरसेवक अमन निर्बाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून गुरुवारी वीरूगिरी केली. या अचानक झालेल्या आंदोलनाने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अधिकारी आणि पोलिसांनी धाव घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर नगरसेवकाला खाली उतरविण्यात यश आले.
अमन निर्बाण हे कळंब चौक परिसराचे नगरपरिषदेत प्रतिनिधीत्व करतात. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून त्यातही कमी दाबाचा असतो. यामुळे अलकबीरनगर, यवतमाळ ग्रामीण, कळंब चौक, दलित वस्ती आदी भागात नागरिक त्रस्त झाले आहे. नगरपरिषदेचा टँकरही वेळेवर पोहोचत नाही. त्यासोबतच भारनियमनाचा कहरही या भागाला सहन करावा लागतो. याबाबत या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून निर्बाण यांनी अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन दिले. परंतु एकाही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला नाही. शेवटी गुरुवारी सकाळी ११.४५ वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर जाऊन चढले. हा प्रकार माहीत होताच टॉवरजवळ गर्दी झाली. अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली.
जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर, उपअभियंता शेषराव दारव्हेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुदाम धुर्वे टॉवरजवळ आले. त्यांनी निर्बाण यांना खाली उतरण्याची विनंती केली. परंतु ते आपल्या आंदोलनावर ठाम होते. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर हा टॉवर असून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी कक्षाबाहेर येऊन निर्बाण यांना खाली येण्यासाठी विनंती केली. परंतु निर्बाण कुणाचेही ऐकत नव्हते. यवतमाळ शहर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक झळके, पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर आपल्या ताफ्यासह दाखल झाले. तब्बल दोन तास आंदोलन सुरू होते. दरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर आंदोलन स्थळी दाखल झाले. त्यांनी निर्बाण यांना खाली या आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करू असे सांगितले. त्यावरून तब्बल दोन तासानंतर अमन निर्बाण खाली आले. त्याच वेळी महाआरोग्य शिबिराच्या बैठकीसाठी आलेले आमदार मदन येरावार यांंनी निर्बाण यांची विचारपूस केली. टॉवरवरून उतरल्यानंतर निर्बाण यांना थेट रुग्णालयात नेण्यात आले.
यानंतर जीवन प्राधिकरण व वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बाळासाहेब मांगुळकर, नगरसेवक अमोल देशमुख, जयसिंग चव्हाण आदींनी चर्चा केली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात महाआरोग्य शिबिरासंदर्भात गुरुवारी बैठक आयोजित होती. या बैठकीला पालकमंत्र्यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते. परंतु कुणीही या आंदोलकांपर्यंत येण्याची तसदी घेतली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)

टॉवरवरून उतरताच नगरसेवक निर्बाण यांना आली भोवळ

पाण्याच्या प्रश्नावरून तब्बल दोन तास नगरसेवक निर्बाण भर उन्हात टॉवरवर चढून होते. दोन तासानंतर ते टॉवरवरून खाली उतरले. तेव्हा त्यांना अचानक भोवळ आली आणि खाली कोसळले. त्यामुळे तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा धरण आटल्यानंतर आठ दिवसातून एकदा पाणी दिले जात आहे. चापडोह प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांना मिळत आहे. परंतु या पाण्यात यवतमाळकरांची तहान भागत नाही. शहराच्या अनेक भागात पाणीटंचाईचे दृश्य दिसते. टँकरने पाणी पुरवठा सुरू असला तरी सर्वांनाच पाणी मिळेल, याची खात्री नसते. त्यामुळे आर्थिक झळ सोसून नागरिक पाणी विकत घेत आहे. शहरातील जलस्रोतही आटल्याने नागरिक हैराण झाले आहे.

Web Title: To the municipal corporation's district tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.