नगरपरिषद शिक्षकांचे वेतन रखडले
By admin | Published: March 1, 2015 02:06 AM2015-03-01T02:06:59+5:302015-03-01T02:06:59+5:30
दिलेल्या वेळेत आणि वारंवार सूचना देवूनही स्थानिक नगरपरिषद प्रशासक आणि लिपिकांनी नगरपरिषदेचे अनुदान निर्धारण करून घेतले नाही.
घाटंजी : दिलेल्या वेळेत आणि वारंवार सूचना देवूनही स्थानिक नगरपरिषद प्रशासक आणि लिपिकांनी नगरपरिषदेचे अनुदान निर्धारण करून घेतले नाही. परिणामी अनुदान उपलब्ध न झाल्याने शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरपरिषदेंतर्गत ३८ शिक्षक कार्यरत आहे. तसेच ४० शिक्षक सेवानिवृत्त आहेत. या सर्वांचे वेतन महिन्याकाठी सुमारे २० लाख रुपये एवढे आहे. अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांनी या आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षक मान्य बाबीवरील खर्चाचे अनुदान मूल्य निर्धारणाबाबत आणि अंतिम हप्ता देय ठरविण्याबाबत पालिकेला पत्र पाठवून मुदत दिली होती. एवढेच नव्हे तर संबंधितांना भ्रमणध्वनीवर वारंवार सूचनाही देण्यात आली. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
पालिकेने अनुदान निर्धारण करून न घेतल्याने ते अमरावती कार्यालयाला शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांना सादर करता आले नाही. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे अनुदान पालिकेला उपलब्ध झाले नाही.दोन महिन्यांचे वेतन नगरपरिषदेच्या अनुदानातून दर महिन्याच्या एक तारखेला अदा होईल, अशी कार्यवाही करावी, शिक्षकांचे वेतन वेळेवर न झाल्यास भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणीस मुख्याधिकारी आणि प्रशासन अधिकारी जबाबदार राहील, असे शिक्षण उपसंचालकांनी पालिकेला कळविले आहे. या पत्रामुळे शिक्षकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. आता आमचे वेतन कोण करणार, अशी विचारणा अरुण पडलवार यांच्या नेतृत्त्वात शिक्षकांनी नगराध्यक्ष चंद्रलेखा रामटेके यांना भेटून केली. मात्र नगरपरिषदेची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. त्यामुळे तुमचे वेतन देवू शकत नाही, असे सांगण्यात आले. यावर उपाययोजनेची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)