डासांच्या निर्मूलनासाठी नगरपरिषदेची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:45 AM2021-09-25T04:45:44+5:302021-09-25T04:45:44+5:30
डेंग्यू, मलेरिया उत्पत्तीच्या डासांचा नायनाट करण्यासाठी पथकाद्वारे टेमिफोस ॲक्टिव्हिटी, फोगिंग, स्प्रेइंग करण्यात येत आहे. ही मोहीम दोन ते तीन ...
डेंग्यू, मलेरिया उत्पत्तीच्या डासांचा नायनाट करण्यासाठी पथकाद्वारे टेमिफोस ॲक्टिव्हिटी, फोगिंग, स्प्रेइंग करण्यात येत आहे. ही मोहीम दोन ते तीन टप्प्यात चालणार असल्याची माहिती नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली. नागरिकांनी या पथकाला सहकार्य करावे, अशी विनंती नगराध्यक्ष वैशाली नाहते, मुख्याधिकारी राजू मोटेमवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मडावी यांनी केली आहे. डेंग्यू व मलेरिया या डासांची उत्पत्ती घरातील व परिसरातील साचून असलेल्या पाण्यात होत असल्यामुळे डेंग्यू व मलेरिया डासांची उत्पत्ती स्थान समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. आपल्या घरातील व अंगणातील कुंड्यात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी राहणार नाही, याची दक्षता घेणे हेसुध्दा गरजेचे आहे. पाणी साठवून ठेवलेले भांडे झाकून ठेवावे, निरूपयोगी टायर्स, नारळाच्या करवंट्या, काचेच्या प्लास्टिकच्या वस्तू घरातून परिसरातून काढून फेकून द्याव्या, असे आवाहन डॉ. संजय मडावी यांनी केले. घरातील कुलर टबमध्ये पाणी असल्यास कुलर टब पालथा करून ठेवावा, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा व घरातील सर्व भांडी कोरडी करून ठेवावीत, जेणेकरून डासांची अंडी भांड्याला चिटकून राहणार नाहीत, असे आवाहन करण्यात आले आहे. रोगाची कोणतीही लक्षणे आढळल्यास नजीकच्या दवाखान्यात जाऊन उपचार करावा, असेही त्यांनी सांगितले. घरातील सेफ्टीक टाक्यांच्या पाईपवर जाळी बसविण्याचे काम नगर परिषदेमार्फत सुरू असून, येणाऱ्या कर्मचाऱ्यास मदत करावी, असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे. या सर्व सूचनांचे नागरिकांनी पालन केल्यास शहरातून डेंग्यू व मलेरिया नक्कीच हद्दपार होईल, याकरिता सर्व नागरिकांनी नगर परिषदेस व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.