पालिका माजी उपाध्यक्षाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 09:47 PM2018-10-14T21:47:25+5:302018-10-14T21:47:50+5:30
येथील नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्षाचा भाजी मार्केट परिसरात येत असताना रविवारी सकाळी आरोपीने घरासमोर अडवून खून केला. या घटनेने संपूर्ण दारव्हा शहरात संतापाची लाट उसळली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्षाचा भाजी मार्केट परिसरात येत असताना रविवारी सकाळी आरोपीने घरासमोर अडवून खून केला. या घटनेने संपूर्ण दारव्हा शहरात संतापाची लाट उसळली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली आहे.
सुभाष चंद्रभान दुधे (४८) रा. बारीपुरा असे मृताचे नाव आहे. सुभाष दुधे यांची भाजी मंडीत अडत आहे. नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता आरोपींनी वाद घातला. त्यानंतर दुधे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जागीच ठार केले. भावाला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या संजय दुधे यांच्यावरही आरोपींनी हल्ला केला. मात्र त्यांनी तेथून सुटका करून घेतली. संजय दुधे यांच्या तक्रारीवरून आरोपी संदीप सुधाकर तोटे (३६), अजय दिगांबर तोटे (४६), सुनील सुधाकर तोटे (३९), सुधाकर बंडाप्पा तोटे (७०), नंदा सुधाकर तोटे (५५), सीमा सुधाकर तोटे (२५) यांच्याविरुद्ध दारव्हा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. दुधे यांच्या हत्येनंतर शहरातील बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद झाली. तणावाची स्थिती असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे, ठाणेदार रिता उईके घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, पुसदचे एसडीपीओ राजू भुजबळ, परिविक्षाधीन एसडीपीओ सुदर्शन, गृह पोलीस उपअधीक्षक अनिलसिंह गौतम, एलसीबी प्रमुख मुकुंद कुलकर्णी, ठाणेदार उत्तम चव्हाण, ठाणेदार रामकृष्ण महल्ले, ठाणेदार अनिल किनगे, ठाणेदार सारंग मिरासी आदी अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसह शहरात डेरा टाकून आहे. याशिवाय राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली आहे. वृत्तलिहिस्तोवर मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले नव्हते. शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
आरोपीने घरासमोरच साधला डाव
सुभाष दुधे यांचे आरोपीच्या घरासमोरुनच जावे लागत होते. सकाळची घाईगडबीने जात असताना आरोपीने खूप केसेस लावल्याचे कारण पुढे करीत वाद घालत हल्ला केला.
यवतमाळात युवकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह
घातपाताचा संशय : रात्रीपासून होता बेपत्ता
यवतमाळ : शहरातील अंबिकानगर परिसरातील सेजल रेसीडेन्सी येथे एका युवकाचा रविवारी दुपारी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.संघर्ष उर्फ मॅगी भीमराव सोनडवले (२४) रा. अशोकनगर असे मृताचे नाव आहे. मॅगी हा शनिवारी रात्री ८.३० वाजता दाऊ नावाच्या मित्रासोबत घराबाहेर निघून गेला. तो परतलाच नाही. सकाळी शोधाशोध केली असता आढळून आला नाही. दरम्यान रविवारी दुपारी अंबिकानगरच्या सेजल रेसीडेन्सी गार्डनमध्ये मॅगीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली, अशी तक्रार भीमराव विठ्ठल सोनडवले यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. काही परिस्थितीजन्य पुराव्याचाही शोध घेण्यात आला. मात्र मृतदेहावर कुठलीही जखम आढळून आली नाही. त्यानंतर हे प्रकरण घातपाताचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.