खून प्रकरणात खर्डा येथील तरुणाला जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:00 AM2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:18+5:30
अजय जयसिंगपुरे याने मागील वर्षी ४ फेब्रुवारी रोजी उमेश देवकर याच्या पत्नीला वरुड गावात तिच्या माहेरी पोहोचवून दिले होते. त्याने केलेल्या या मदतीबद्दल उमेशच्या मनात मात्र राग निर्माण झाला. अजय आणि आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन त्याने वाद घातला. यात त्याने चाकूचे वार करून अजयचा खून केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आपल्या पत्नीला माहेरी जाण्यासाठी मदत करणाºया इसमावर अनैतिक संबंधाचा संशय घेऊन त्याचा खात्मा केला. बाभूळगाव तालुक्यातील खर्डा गावात गेल्या वर्षी हा थरार घडला होता. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
उमेश श्यामराव देवकर (२८) रा. खर्डा असे यातील आरोपीचे नाव आहे. तर अजय रामदास जयसिंगपुरे (४७) असे या घटनेतील मृत इसमाचे नाव आहे.
अजय जयसिंगपुरे याने मागील वर्षी ४ फेब्रुवारी रोजी उमेश देवकर याच्या पत्नीला वरुड गावात तिच्या माहेरी पोहोचवून दिले होते. त्याने केलेल्या या मदतीबद्दल उमेशच्या मनात मात्र राग निर्माण झाला. अजय आणि आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन त्याने वाद घातला. यात त्याने चाकूचे वार करून अजयचा खून केला. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या अजयला दवाखान्यात नेताना त्याच मुलगा अक्षय याच्यावरही आरोपीने चाकूने वार केले होते. या प्रकरणात मयताने मृत्यूपर्व जबानी नोंदविली होती. त्यावरून बाभूळगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक सोपान पाटोळे, प्रदीप पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात अजयची मृत्यूपूर्व जबानी नोंदविणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, तसेच अजयचा मुलगा अक्षय याची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेटकर यांनी आरोपी उमेश देवकर याला जन्मठेप दिली. तसेच ५०० रुपये दंड व न भरल्यास तीन महिने कारावास अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. मंगेश एस. गंगलवार यांनी बाजू मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश रत्ने यांनी काम पाहिले.