धारदार शस्त्राने वार करून विधवेचा खून; संशयिताच्या घरातून तलवार, मोबाइल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 01:41 PM2023-06-24T13:41:11+5:302023-06-24T13:41:29+5:30
बोरगाव येथील घटना
आर्णी (यवतमाळ) : तालुक्यातील बोरगाव येथे छातीवर धारधार शस्त्राने सपासप वार करून विधवेचा खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सुनीता दत्ता मुधळकर (४५), असे मृत महिलेचे नाव आहे.
सुनीता विधवा आहे. तिला दोन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे. मुली आपल्या घरी सासरी असून मुलगा पुण्यात काम करण्यासाठी गेला आहे. त्यामुळे सुनीता एकटीच बोरगाव येथे वास्तव्याला आहे. ती दगड फोडण्याचे काम करते. गुरुवारी ती लगतच्या पांगरी येथे दगड फोडण्यासाठी गेली होती. काम आटोपून ती सायंकाळी घरी परतली होती. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास तिची हत्या करण्यात आली.
तिच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांना संशय आहे. मात्र, त्याच्या घराला कुलूप होते. पोलिसांनी कुलूप तोडून त्याच्या घरातून मोबाइल, एक तलवार, धारदार सुरा जप्त केला आहे. खून करण्यापूर्वी संशयिताने सुनीतासोबत अनैतिक कृत्य केल्याचाही पोलिसांना संशय आहे. घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथक बोलावले होते. ते संशयिताच्या घराजवळ घुटमळत होते. त्या संशयिताचे शेजारील दुसऱ्या महिलेसोबत भांडण झाले होते. त्याची पत्नी १५ दिवसांपूर्वी आईच्या गावी निघून गेली आहे. पत्नी घरी नसल्याने त्याने मृत सुनीतासोबत जबरीने अनैतिक कृत्य करून तिचा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
१० वर्षांपूर्वीच झाले पतीचे निधन
मृत सुनीताच्या पतीचे १० वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तिनेच मुलांचा सांभाळ केला. मुलींचे विवाह केले. मुलगा पुण्याला असल्याने ती घरी एकटीच होती. तिच्या भावाने याप्रकरणी आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पाेलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी भेट दिली. ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पाटील, सतीश चौधार, मनोज चव्हाण पुढील तपास करीत आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी बोरगाव येथे पोलिस चौकी देण्याची मागणी २००६ मध्ये केली होती. आर्णी पोलिसांच्या हद्दीतील बोरगाव हे मोठे गाव आहे. तेथे पोलिस चौकी त्वरित देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.