जादूटोण्याच्या संशयातून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 05:00 AM2022-02-13T05:00:00+5:302022-02-13T05:00:21+5:30
लक्ष्मण मसू जाधव (५५), रा. वाघाडी असे मृताचे नाव आहे. लक्ष्मण हा गवंडीकाम करून कुटुंबाचा गाढा हाकत होता. त्याचा मुलगा, सून परिसरातीलच ढाब्यावर कामाला होते. एकाच समाजाची वसाहत वाघाडी परिसरात आहे. तेथेच लक्ष्मण राहत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मण हा जादूटोणा करतो, मूठ मारतो, यामुळे माणसाचा मृत्यू होतो, असा समज पसरला होता. समाजातील काही जण त्याचा रागाराग करू लागले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अंधश्रद्धा डोक्यात भिनल्यावर काय होऊ शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा शुक्रवारी रात्री आला. वाघाडी पोड येथे मोलमजुरी करून राहणाऱ्या वृद्धावर काही जणांनी जादूटोण्याचा संशय व्यक्त केला. कुटुंबातील दोघांचा मृत्यू मूठ मारल्याने झाल्याचा समज करून घेत वृद्धावर चाकूने सपासप वार केले. ही घटना आर्णी मार्गावर होमगार्ड समादेशक कार्यालयातील मैदानात घडली. याप्रकरणी दोन अल्पवयीनांसह एका युवकाला अवधूतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
लक्ष्मण मसू जाधव (५५), रा. वाघाडी असे मृताचे नाव आहे. लक्ष्मण हा गवंडीकाम करून कुटुंबाचा गाढा हाकत होता. त्याचा मुलगा, सून परिसरातीलच ढाब्यावर कामाला होते. एकाच समाजाची वसाहत वाघाडी परिसरात आहे. तेथेच लक्ष्मण राहत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मण हा जादूटोणा करतो, मूठ मारतो, यामुळे माणसाचा मृत्यू होतो, असा समज पसरला होता. समाजातील काही जण त्याचा रागाराग करू लागले होते. देवकार्याच्या कार्यक्रमातून आठ दिवसांपूर्वी लक्ष्मणला हुसकावून लावण्यात आले होते. या भीतीपोटी लक्ष्मण घराकडे जाताना रस्ता बदलवित होता, तो नेहमीच होमगार्ड समादेशक कार्यालयातील मैदानातून घराकडे जात होता. लक्ष्मणने जादूटोणा केल्यामुळे गाेविंद शेळके व विनोद शेळके यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्यावर होता. त्यामुळेच शेळके कुटुंबातील अल्पवयीन तसेच अभय सुदाम नैताम (१८), रा. वाघाडी हे तिघे वचपा काढण्याच्या तयारीत होते.
घटनेच्या दिवशी लक्ष्मण नेहमीप्रमाणे मोलमजुरी करून भाजीपाला घेऊन घराकडे जात होता. दरम्यान, हल्लेखोर आर्णी मार्गावरील पेट्राेलपंपावर पेट्रोल भरत होते. तेथूनच त्यांनी लक्ष्मणचा पाठलाग सुरू केला. अंधारात एकट्याला गाठून लक्ष्मणवर चाकूने सपासप वार करण्यात आले. घराजवळच काही अंतरावर तो कोसळला. आरोपी तेथून पसार झाले.
लक्ष्मण जाधव यांची सून मीनाक्षी हिला लक्ष्मण रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसले. तिने ही घटना धावत जाऊन पतीला सांगितली. युवराज लक्ष्मण जाधव याच्या तक्रारीवरून पोलिसांनी संगनमताने खून केल्याचा गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे, प्रभारी एसडीपीओ प्रदीप पाटील घटनास्थळी पोहोचले. अवधूतवाडी पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध घेणे सुरू केले. खुनाचे कारण उघड होताच तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. यातील अभय नैताम याने गुन्ह्याची कबुली दिली. याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल सेजव यांच्याकडे देण्यात आला आहे.
साहेब, तो मावशीचे मूलही मारत होता
- लक्ष्मण जाधव जादूगार होता, त्याने मूठ मारली की माणूस मरून जात होता. यामुळेच त्याला खतम केले, त्याने आमच्या घरचे दोन जीव घेतले. आता तो माझ्या मावशीच्या लहान मुलांनाही मारेल, अशी भीती होती. म्हणूनच, त्याला संपविल्याची कबुली विधिसंघर्षग्रस्त बालकांनी अवधूतवाडी पोलिसांकडे दिली.