प्रेमकुमारचा खून उसन्या पैशाच्या वादातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:03 AM2017-11-03T01:03:50+5:302017-11-03T01:04:45+5:30

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुसदमध्ये वास्तव्याला आलेल्या तरुणाचा खून उसनवारीच्या पैशातून झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

The murder of Premkumar from the dispute of money | प्रेमकुमारचा खून उसन्या पैशाच्या वादातून

प्रेमकुमारचा खून उसन्या पैशाच्या वादातून

Next
ठळक मुद्देदोघे जेरबंद : पुसद येथील खूनप्रकरणी आरोपींची कबुली, सात दिवसांची पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुसदमध्ये वास्तव्याला आलेल्या तरुणाचा खून उसनवारीच्या पैशातून झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. बुधवारी सकाळी धनकेश्वर देवस्थान परिसरात ७० ते ७५ वार करून प्रेमकुमार ठाकरे याचा खून करण्यात आला होता. अवघ्या २४ तासात पोलिसांनी खूनाचा छडा लावून आरोपींना अटक केली.
पाशा ऊर्फ शेख एजाज शेख अयूब (२५) रा.पार्वतीनगर आणि पप्पू ऊर्फ शेख एफाज शेख अफसर (२५) रा.वसंतनगर, पुसद अशी आरोपींची नावे आहे. या दोघांनी ३१ आॅक्टोबरच्या रात्री १० वाजताच्या सुमारास प्रेमकुमार विठ्ठलराव ठाकरे (२६) रा.हिमायतनगर, जि.नांदेड याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केला होता. प्रेमकुमार येथील शिवाजी वॉर्डात भाड्याच्या खोलीत राहत होता. मुख्य आरोपी पाशा ऊर्फ शेख एजाज शेख अयूब याला ३२ हजार रुपये उसनवारीने प्रेमकुमारने दिले होते. ते पैसे प्रेमकुमार पाशाकडे सतत मागत होता, तर पाशा टाळाटाळ करीत होता. यावरून त्यांच्यात वाद झाला. वादात मेकॅनिकल असलेल्या पाशाने मिस्त्री काम करणारा त्याचा मित्र पप्पू ऊर्फ शेख एफाज शेख अफसर याची मदत घेतली. पैसे परत देतो असे म्हणून प्रेमकुमारला दुचाकीवर बसवून वाशिम मार्गावरील धनकेश्वर देवस्थान परिसरात नेले. तेथे धारदार शस्त्राने प्रेमकुमारवर ७० ते ७५ वार केले. त्याचा मृतदेह नालीत टाकून दिला.
१ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास प्रेत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. खिशातील आधारकार्ड व इतर कागदांवरून त्याची ओळख पटविली. तसेच अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
सहायक पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रकाश शेळके व वाघू खिल्लारे यांनी तपासाची चक्रे फिरविली. दरम्यान, प्रेमकुमारच्या प्रेताची उत्तरीय तपासणी करून हिमायतनगर येथे बुधवारी रात्री १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचदरम्यान वसंतनगर पोलिसांनी पाशाला अटक केली.
मोबाईल कॉल डिटेल्सने प्रकरणाचा छडा
प्रेमकुमार ठाकरे याच्याकडे पोलिसांना मोबाईल आढळला. त्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरून तपासाची दिशा मिळाली. पोलीस उपनिरीक्षक राजू खांदवे, नीलेश शेळके, बसवराज तमशेट्टे, विनय चव्हाण तसेच डीबी पथकातील गोपाल वास्टर, मुन्ना आडे, नंदू चौधरी आदींनी शोध जारी केला. पाशा ऊर्फ शेख एजाज शेख अयूबला पुसद येथून तर पप्पू ऊर्फ शेख एफाज शेख अफसर याला मंगरूळपिर जि.वाशिम येथून गुरुवारी पहाटे जेरबंद केले. दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिल्याचे सहायक पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: The murder of Premkumar from the dispute of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.