माझ्या यशाचे सर्वाधिक कौतुक माझ्या शिक्षकांना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 06:00 AM2019-09-05T06:00:00+5:302019-09-05T06:00:14+5:30
मी तसा ‘अॅव्हरेज’ गुण मिळविणारा विद्यार्थी होतो. पण शिक्षकांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे मीही शिष्यवृत्ती मिळवित गेलो. त्यातून प्रोत्साहन मिळत गेले. मे आज जो काही आहे, ते केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच. आमच्या चंदीगडच्या शिक्षकांसोबत मी आजही सतत संपर्कात राहतो.
यवतमाळ : माझ्याच काय पण कुणाच्याही यशाचे खरे शिल्पकार हे शिक्षकच असतात. मी लहान असताना खोडकर होतो. मी शिक्षकांचा मारही खाल्ला आणि शिष्यवृत्तीही मिळविली. पण त्यावेळी शिक्षकांनी दरडावले नसते, तर आज येथपर्यंतचा यशाचा पल्ला गाठता आला नसता. मी ज्यावेळी आयएएस झालो, त्यावेळी सर्वाधिक कौतुक माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांना वाटले. परीक्षेची तयारी करताना जेव्हा जेव्हा मी माझे ध्येय विसरलो, तेव्हा शिक्षकांनीच मला त्या ध्येयाची आठवण करून दिली, अशा शब्दात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी आपल्या शिक्षकांची महती सांगितली.
गावी जातो तेव्हा शिक्षकांना आवर्जून भेटतोच
मी तसा ‘अॅव्हरेज’ गुण मिळविणारा विद्यार्थी होतो. पण शिक्षकांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे मीही शिष्यवृत्ती मिळवित गेलो. त्यातून प्रोत्साहन मिळत गेले. मे आज जो काही आहे, ते केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच. आमच्या चंदीगडच्या शिक्षकांसोबत मी आजही सतत संपर्कात राहतो. जेव्हा जेव्हा मी गावाकडे चंदीगडला जातो, तेव्हा तेव्हा सर्व जुन्या शिक्षकांना आवर्जुन भेटतो. त्यांचे शब्द आजही तेवढेच महत्त्वाची आणि प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांचा फोनवरचा संपर्कदेखील माझ्यासाठी फार मोठी ताकद असते. अशा माझ्या सर्व शिक्षकांना वंदन! आपल्या जिल्ह्यातीलही सर्व शिक्षकांना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वांगीण विकास अन् करिअरवर फोकस...
चंदीगडच्या शाळेत शिकताना मी आईवडिलांपेक्षाही अधिक काळ शिक्षकांच्या संपर्कात राहात होतो. शालेय शिक्षकांनी सतत नैतिक मूल्यांचे संस्कार केले. मात्र जेव्हा मी महाविद्यालयीन शिक्षणाला सुरूवात केली, त्यावेळच्या शिक्षकांचा विशेष उल्लेख करावा लागेल. या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर तर भर दिला होताच. पण त्यांचे पूर्ण अध्यापन हे ‘करिअर फोकस’ होते.
मला भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे आहे, हे माझे ध्येय माझ्यापेक्षाही माझ्या गुरूंनी अधिक लक्षात ठेवले. स्पर्धा परीक्षेतून जेव्हा माझे ‘सिलेक्शन’ झाले, त्यावेळी मी सर्वात आधी माझ्या शिक्षकांना भेटलो. त्यांचे आशीर्वाद सतत माझ्यासोबत असतात. आपल्या जिल्ह्यातही अनेक चांगले शिक्षक आहेत, पण केवळ काही चांगल्या शिक्षकांच्या बळावर काम भागणार नाही. तर प्रत्येक शिक्षकाने आपले कर्तव्य काटेकोरपणे बजावणे आवश्यक आहे. त्यांना काही सांगण्याएवढा मी मोठा नाही. पण शिक्षकांकडून समाजाची फार मोठी अपेक्षा असते, ती पूर्ण झाली पाहिजे.
शिक्षकांनीच लावला वाचनाचा छंद...
शिक्षकांमुळे आणि शाळेमुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत गेली. शिक्षकांमुळेच मला वाचनाचा छंद लागला. त्या छंदामुळेच मला यूपीएससीसारख्या परीक्षेत यश मिळविण्याची ताकद मिळाली. महात्मा गांधी यांचे ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक मला खूप आवडते. त्यातून जीवनातील संकटांवर कशी मात करावी, हे कळते. तसेच ‘अमरचित्रकथा’ची संपूर्ण सिरीजही माझ्या अत्यंत आवडीची आहे.