दिग्रस येथे नाफेडची तूर खरेदी बंदच
By admin | Published: March 30, 2017 12:08 AM2017-03-30T00:08:14+5:302017-03-30T00:08:14+5:30
येथील बाजार समितीच्या यार्डात नाफेडतर्फे करण्यात येणारी तूर खरेदी गत १५ दिवसांपासून बंद आहे.
शेतकरी हवालदिल : गोदामांचा अभाव
दिग्रस : येथील बाजार समितीच्या यार्डात नाफेडतर्फे करण्यात येणारी तूर खरेदी गत १५ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे बाजार समितीच्या यार्डात व शेडबाहेर हजारो क्विंटल तूर उघड्यावर आहे. तूर विकली जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यातील शेतकऱ्यांकडून नाफेड खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून तूर खरेदी करीत आहे. दोन आवठड्यापूर्वी ढगाळ वातावरणाचे कारण पुढे करत तूर खरेदी बंद करण्यात आली होती. १५ मार्चपर्यंत १० हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. परंतु त्यानंतर तूर खरेदी सुरूच झाली नाही. शेतकरी मोठ्या आशेन तूर घेऊन येथे येतात, परंतु तूर विकली जात नाही.
येथील गोदामाची क्षमता संपल्याने आता अमरावती येथील गोदामात तुरी पाठवाव्या लागत आहे. परंतु वाहतुकीच्या खर्चासाठी आर्थिक तजवीज नसल्याने तूर खरेदी बंद असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात सुरूवातील बारदाना नसल्याने तूर खरेदी बंद होती. परंतु दिग्रस येथे बारदान उपलब्ध असताना केवळ वाहतूक खर्चासाठी तूर खरेदी बंद आहे. याबाबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी बी.एच. ढाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तूर वाहतुकीच्या खर्चासाठी ५० हजार रुपयांची व्यवस्था करून देण्याची तयारी दर्शविली. परंतु एवढ्या पैशात अमरावतीला तूर पाठविणे शक्य नाही. याबाबत खरेदी-विक्रीच्या संचालकांनी यवतमाळ येथे जाऊन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकाऱ्यांची भेट घेतली. आता यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
नाफेडची खरेदी बंद असल्याने शेतकरी आपली तूर बाजारात विक्रीसाठी नेत आहे. परंतु व्यापाऱ्यांचा भाव निश्चांकी आहे. तुरीची डाळ तेजीत असताना तूर मात्र कमी किमतीत विकावी लागत आहे. एकीकडे नाफेडची खरेदी बंद आणि दुसरीकडे खासगी व्यापाऱ्यांकडून लूट अशा स्थितीत शेतकरी अडकला आहे. यातून मार्ग काढण्याची मागणी आहे.