Nagar panchayat election result 2022; यवतमाळात काॅंग्रेसचे पाऊल गतवैभवाकडे, भाजपवर आत्मचिंतनाची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 09:24 PM2022-01-19T21:24:07+5:302022-01-19T21:28:14+5:30
Yawatmal News नगरपंचायत निवडणुकीत एकही आमदार नसताना यवतमाळात काॅंग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत भाजपला बॅकफूटवर ढकलले आहे.
यवतमाळ : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत संख्याबळ कमी असतानाही काॅंग्रेसने अध्यक्षपद स्वत:कडे खेचून चमत्कार केला होता. त्यानंतर आता नगरपंचायत निवडणुकीत एकही आमदार नसताना पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत भाजपला बॅकफूटवर ढकलले आहे. त्याच वेळी जिल्ह्यात शिवसेनेचीही ताकद वाढल्याने हा निवडणूक निकाल भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा आहे.
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीतील निवडणुका यंदा रंगतदार झाल्या. काॅंग्रेस, शिवसेनेसह भाजप आणि राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष स्वबळ आजमावत असल्याने याचा फटका महाआघाडीतील तिन्ही पक्षांना बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात होती. प्रत्यक्षात निवडणूक निकालात मतदारांनी राजकीय जाणकारांंचा हा अंदाज फोल ठरविला. विधानसभेचा एकही आमदार नसलेल्या काॅंग्रेसच्या पारड्यात मतदारांनी सर्वाधिक ३९ जागा टाकल्या. तर प्रभावी नेतृत्वाविना निवडणूक लढवित असलेल्या शिवसेनेलाही दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या. शिवसेनेकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद असले तरी संदीपान भुमरे हे केवळ शासकीय कार्यक्रमापुरते जिल्ह्यात येतात.
दुसरीकडे संजय राठोड मंत्रिपदाविना आहेत तर खासदार भावना गवळी वाशिममध्येच व्यस्त असतानाही शिवसेनेने नगर पंचायतीत लक्षवेधी कामगिरी केली. याचे बहुतांश श्रेय शिवसैनिकाला जाते. त्या तुलनेत भाजपकडे तब्बल सहा आमदार, त्यातही दोन माजी मंत्री असताना पक्षाने या निवडणुकीत मागील नगरपंचायतीच्या तुलनेत तब्बल १५ जागा गमावल्या आहेत. सहा नगरपंचायतीतील निवडणूक निकालाची आकडेवारी पाहिली असता सत्तेचे गणित महाविकास आघाडीच्या बाजूने झुकत आहे. आघाडीतील प्रमुख पक्षाचे नेते काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. दरम्यान या निवडणुकीत वंचितसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपले खाते उघडले आहे. तर झरीमध्ये जंगोम दलाने चार जागा जिंकत चमकदार कामगिरी केली आहे. अपक्षांची संख्याही वाढली आहे.