देशभर विखुरलेल्या १३ कोटी बंजारांच्या एकतेचा ‘नगारा’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 05:17 AM2018-12-07T05:17:06+5:302018-12-07T05:17:15+5:30
सिंधु संस्कृतीशी नाळ सांगणारा प्राचीन बंजारा समाज आज देशभरात विविध राज्यात आणि विविध मागास प्रवर्गात विखुरला आहे.
यवतमाळ : सिंधु संस्कृतीशी नाळ सांगणारा प्राचीन बंजारा समाज आज देशभरात विविध राज्यात आणि विविध मागास प्रवर्गात विखुरला आहे. पण हे विखुरलेले १३ कोटी बंजारा बांधव सोमवारी महाराष्ट्रात एकवटले होते. आपली भाषा, आपली संस्कृती, आपली लोककला या सर्वांचे ऋण फेडण्यासाठी पोहरादेवीत ‘नगारा’ वास्तू उभी केली जात आहे. त्याच्या भूमिपूजनासाठी ५ लाख बंजारा बांधवांनी एकत्र येऊन अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. एखाद्या समाज संस्कृतीचे असे संग्रहालय साकारण्याची जगातील अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे, हे विशेष.
वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता. मानोरा) हे श्रद्धास्थळ बंजारा समाजाची काशी समजली जाते. येथेच बंजारा संस्कृतीचे गतवैभव जपणारे नगारा या वाद्याच्या आकाराच्या आकाराचे वस्तूसंग्रहालय उभारले अहे.
देशाच्या वेगवेगळ्या भूभागात वास्तव्य करणाऱ्या बांजारा समाजाचे एकत्र विराट दर्शन घडावे, ही समाजाची अनेक वर्षांची अभिलाषा होती. या अभिलाषेला राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रत्यक्षात साकारले. सोमवारी ३ डिसेंबर रोजी झालेल्या नगारा भूमिपूजनाच्या निमित्ताने पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार हरिभाऊ राठोड, आमदार मनोहरराव नाईक आणि कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील बंजारा समाजाचे आमदारही पोहरागडावर आणले.
पोहरादेवीचा विकास आराखडा १२५ कोटींचा आहे. त्यातले २५ कोटी शासनाने दिले, तर १०० कोटी देण्याची घोषणा केली. नॉनक्रिमिलिअरची अट वगळण्याची मागणी पुढे आली. ३०० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या बंजारा तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी ऐरणीवर आली. वसंतराव नाईक महामंडळाला अध्यक्षच नसल्याची बाब प्रकर्षाने सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या सर्व मागण्यांमधून बंजारा विकासाच्या आकांक्षांचा आसमंत स्पष्ट झाला.