नागपूर ६०० अन् अमरावती २०० रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 09:37 PM2017-10-20T21:37:45+5:302017-10-20T21:37:58+5:30

एसटी कामगारांचा संप सुरू असल्याने एसटीची चाके थांबली. ही संधी साधून खासगी वाहतुकदारांनी नागपूरचे भाडे चक्क ६००, तर अमरावतीचे भाडे २०० रूपयांवर नेले.

Nagpur 600 and Amravati 200 rupees | नागपूर ६०० अन् अमरावती २०० रूपये

नागपूर ६०० अन् अमरावती २०० रूपये

Next
ठळक मुद्देप्रवाशांच दिवाळं : खासगी वाहतूकदारांची दिवाळी, एसटीच्या संपाने प्रवाशांवर संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एसटी कामगारांचा संप सुरू असल्याने एसटीची चाके थांबली. ही संधी साधून खासगी वाहतुकदारांनी नागपूरचे भाडे चक्क ६००, तर अमरावतीचे भाडे २०० रूपयांवर नेले.
एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांनी वेतनवाढ व विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला. शुक्रवारपर्यंत संपावर कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होत आहे. सर्वच बसफेºया रद्द झाल्याने प्रवाशांना प्रवास करण्यासाठी खासगीशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. या संधीचा लाभ घेत खासगी वाहतुकदारांनी दर वाढवित दिवाळी साजरी केली. सध्या खासगीचे दर गगनाला भीडले आहे. बसच्या तिकीटाच्या दुप्पट पैसे मोजून प्रवाशांना खासगी वाहनांत जनावरांप्रमाणे कोंबून प्रवास करावा लागत आहे.
यवतमाळहून नागपूरचे एसटीचे प्रवास भाडे १४८ रूपये आहे. ते खासगी वाहतुकदारांनी चक्क ६०० रूपये केले असल्याची माहिती एसटी कर्मचारी संघटनेच्या एका पदाधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली. अमरावतीचे भाडे १०२ रूपयांवरून २०० रूपये, तर घाटंजीचे तिकीट ५० रूपयांवरून १०० रूपयांवर पोहोचले आहे. आर्णीचे तिकीट ५० रूपयांवरून ८०, धामणगावचे भाडे १२० रूपयांच्या घरात पोहोचले आहे. वणीसाठी आता १०० ऐवजी २०० रूपये मोजावे लागत आहे. सर्वच गावांचे दर वाढल्याने प्रवासी त्रस्त झाले. त्यात भाऊबिज करिता माहेरी जाण्यासाठी बस नसल्याने महिलांची अडचण झाली.
एसटी कामगार संपावर ठाम
मागण्या पूर्ण होईपर्यंत हा संप सुरू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला. कर्मचाºयांच्या भूमिकेविरूद्ध सरकारने चुकीचे धोरण अवलंबिल्याचा आरोप महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे विभागीय सचिव स्वप्नील तगडपल्लेवार यांनी केला. एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष राहुल धार्मिक यांनी कर्मचाºयांविरूद्ध परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भूमिका घेतल्याने संपकर्ते कर्मचारी नाराज असल्याचे स्पष्ट केले. सरकारने अंगणवाडीतार्इंबाबत जी आपुलकी दाखविली, तशी आपुलकी एसटी कर्मचाºयांबाबत दाखवायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त केली. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
स्कूलबसचा पर्याय
खासगी वाहतुकदारांनी प्रवाशांची लूट सुरू केल्याने जिल्हा प्रशासनाने यावर मात करण्यासाठी स्कूल बसचा पर्याय सुचविला. त्यासाठी सहा बस मागविण्यात आल्या. शनिवारी भाऊबीजेसाठी खास स्कूलबसची व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. काही शाळांना बस मागणीचे पत्र पाठविण्यात आले. मात्र या शाळांनी पत्राला केराची टोपली दाखविली आहे. दुसरीकडे गत चार दिवसात जिल्ह्यात ३२०० बसफेºया रद्द झाल्याने महामंडळाचे सुमारे ८० लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.

Web Title: Nagpur 600 and Amravati 200 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.