पैनगंगेच्या पुरामुळे नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद, वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 03:38 PM2021-09-30T15:38:37+5:302021-09-30T15:47:03+5:30
अतिवृष्टीमुळे ईसापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ होऊन धरण १०० टक्के भरले आहे. याचा फटका राष्ट्रीय महामार्गावरील विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या मार्लेगाव पुलाला बसला. या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या ३६ तासांपासून ठप्प आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या ३६ तासांपासून ठप्प आहे. पैनगंगा नदीला पूर आला आहे आणि या पुराचं पाणी उमरखेड तालुक्यातील मार्लेगावजवळच्या पुलापर्यंत आलंय. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला असून पुलाच्या दोन्ही बाजूस वाहने थांबविण्यात आली आहे.
काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ईसापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ होऊन धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. याचा फटका राष्ट्रीय महामार्गावरील विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या मार्लेगाव पुलाला बसला. पुराची ही परिस्थती लक्षात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी मार्लेगाव पुलावरून वाहतूक बंद केली आहे. परिणामी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.
सततच्या पावसामुळे ईसापूर धरण १०० टक्के भरल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या पैनगंगा नदीला पूर आला आहे. कयाधु नदीचे पाणीदेखील पैनगंगेला मिळाले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपविभागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर परिस्थिती पाहण्यासाठी नागरिकांनी नदी नाल्यावर जाऊ नये, नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.