नेरमध्ये लवकरच ’एमआयडीसी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:12 PM2018-09-21T22:12:34+5:302018-09-21T22:13:16+5:30
रोजगारासाठी परप्रांतात भटकंती करणाऱ्या तालुक्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी शहरातच उपलब्ध होणार आहे. ४७ हेक्टर क्षेत्रात एमआयडीसी (औद्योगिक क्षेत्र) होणार आहे. मुंबई मंत्रालयाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजूसिंग पवार यांनी यासाठी शुक्रवारी जागेची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : रोजगारासाठी परप्रांतात भटकंती करणाऱ्या तालुक्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी शहरातच उपलब्ध होणार आहे. ४७ हेक्टर क्षेत्रात एमआयडीसी (औद्योगिक क्षेत्र) होणार आहे. मुंबई मंत्रालयाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजूसिंग पवार यांनी यासाठी शुक्रवारी जागेची पाहणी केली.
दारव्हा रोडवरील नबाबपूर गटातील जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृहाजवळील जागा प्रस्ताविक करण्यात आली आहे. साठी मोका पाहणी औद्योगिक विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजूसिंग पवार, अमरावती विभागीय प्रादेशिक विकास महामंडळ अधिकारी एस.बी. फुके, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार अमोल पोवार, नेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नीलेश जाधव, नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांनी जागेची पाहणी केली.
शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, शहर प्रमुख दीपक आडे आदींनी नेर शहरात औद्योगिक वसाहत व्हावी यासाठी निवेदने दिली. नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांनीही यासाठी पाठपुरावा केला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयात हा विषय लाऊन धरला. अखेर यादृष्टीने जागेची पाहणी तेजकुमार पवार यांनी केली.
लहानांपासून मोठ्या उद्योगांना संधी
नेर शहरातील औद्योगिक क्षेत्रात खते, औषधी, हिरा कारखाना, कापूस केंद्र, रेचे, ट्रक, स्कूटर, सायकल, घड्याळ, दूध शीतकेंद्र, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अन्न पदार्थ आदी उद्योगाची उभारणी केली जाणार आहे. कारखान्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या भूखंडाची आखणी, शेड उभारणी, रस्ते, पाणी, वीज आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. बँक, डाकघरही याठिकाणी असणार आहे.
प्रस्तावित जागेला लवकरच मंजुरी मिळून नेरमध्ये एमआयडीसी साकारली जाईल. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. एमआयडीसीमुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल.
- संजय राठोड, महसूल राज्यमंत्री
एमआयडीसीसाठी जागेची पाहणी करण्यात आली आहे. दारव्हा रोडवरील जागा योग्य आहे. लवकरच अंतरिम मंजूरी मिळून एमआयडीसी साकार होणार आहे.
- तेजूसिंग पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, औद्योगिक विभाग, मंत्रालय, मुंबई
एमआयडीसीसाठी जागेची पाहणी आणि शिक्कामोर्तब झाल्याने शहराच्या वैभवात भर पडणार आहे. शिवाय तालुक्यातील बेरोजगारांना काम मिळेल.
- पवन जयस्वाल, शिवसेना गट प्रमुख नगरपरिषद, नेर