जंगलात सापडला महिलेचा निर्वस्त्र मृतदेह, पोटावर चाकूचे घाव; पांढरकवड्यातील घटनेने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 11:00 AM2022-06-11T11:00:25+5:302022-06-11T11:04:23+5:30
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटविली. मृत कावेरीच्या पोटावर चाकूचे पाच ते सहा वार असल्याचे दिसून आले.
पाटणबोरी (यवतमाळ) : वाऱ्हा कवठा ते वांजरी दरम्यान उजाड खैरगाव शिवारात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या बिट क्रमांक ६२ मध्ये जंगलात एका महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या पोटावर चाकूचे घाव असून, तिचा खून झाल्याचे उघड झाले आहे. त्याच दिशेने पांढरकवडा पोलिसांचा तपास सुरू आहे.
मृत महिला पांढरकवडा तालुक्यातील कारेगाव बंडल येथील रहिवासी असून, कावेरी जलपत तोडसाम (वय ३५) असे तिचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती गेल्या काही दिवसांपासून मांगुर्डा येथील बहिणीकडे राहत होती. ८ जूनला सकाळी १० वाजता बहिणीच्या मुलाने दुचाकीने तिला पांढरकवडा येथे सोडले होते. त्यानंतर ती कारेगाव येथे पोहाेचलीच नाही. त्यामुळे त्यांनी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिचा फोन लागत नव्हता. नातेवाइकांकडे शोधाशोध केली. मात्र, तिचा शोध काही लागला नाही. अखेर तिच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी पांढरकवडा पोलीस ठाण्यात कावेरी बेपत्ता असल्याची तक्रार केली.
तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. यादरम्यान, वाऱ्हा कवठा ते वांजरी दरम्यान जंगलात एका महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पांढरकवडाचे ठाणेदार जगदीश मंडलवार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटविली. मृत कावेरीच्या पोटावर चाकूचे पाच ते सहा वार असल्याचे दिसून आले.
मारेकरी कोण?
या खून प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पांढरकवडा पोलिसांपुढे आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश गायकवाड, संदीप वारिंगे, जमादार वसंता चव्हाण, नायक पोलीस किशोर आडे करीत आहेत.