नालीतले पाणी घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 10:23 PM2017-12-17T22:23:25+5:302017-12-17T22:24:19+5:30
ग्रामपंचायतीने खोदून ठेवलेली नाली नगरपरिषदेनेही पक्की केली नाही. आता सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. यामुळे हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ग्रामपंचायतीने खोदून ठेवलेली नाली नगरपरिषदेनेही पक्की केली नाही. आता सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. यामुळे हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाघापूर (टेकडी) परिसराच्या बनकर ले-आऊटमधील ही समस्या सोडविण्यासाठी आता नगराध्यक्षांनीच लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सांडपाण्याचा प्रश्न वाघापूर परिसरातील नागरिकांच्या जणू पाचवीलाच पूजला आहे. ग्रामपंचायतीने पाणी वाहून जाण्यासाठी कच्ची नाली खोदून ठेवली. बनकर ले-आऊटमध्ये ९०० फूट खोदलेल्या नालीतून पाणी वाहून जात नाही, उतार नाही, कचरा भरला आहे. त्यामुळे या नालीत सोडलेले पाणी मागे सरून लोकांच्या घरात शिरत आहे. उपयोग होणे तर दूर नुकसानकारकच ठरत आहे.
१०० ते २०० घरांसमोरून ही नाली काढण्यात आली आहे. दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नगरपरिषदेच्या वाघापूर विभाग कार्यालयाकडे हा प्रश्न वारंवार मांडण्यात आला. ग्रामपंचायतीकडे हा भाग असताना आलेला अनुभवच नगरपरिषदेकडूनही येत आहे. या विभागाचे कर्मचारी नाली उपसण्यासाठी अपवादानेच येतात. वाघापूर आॅटो पॉर्इंटपर्यंत सांडपाणी साचून राहते. ही बाब स्वच्छता अभियानाला ठेच पोहोचविणारी आहे. पालिकेने हा गंभीर प्रश्न निकाली काढावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.
घंटागाड्यांची समस्या कायम
ग्रामपंचायत क्षेत्रात हा भाग असताना घंटागाड्या महिन्यातून काही दिवस तरी कचरा घेण्यासाठी वॉर्डात पोहोचत होत्या. आता मात्र या गाड्या क्वचितच फिरतात. कचराकुंड्या नाही, योग्य जागा नाही त्यामुळे घरातील कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न नागरिकांपुढे आहे.