नाव पोलीस... पण, स्वत:चाच आनंद ठेवावा लागतो ओलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 05:00 AM2021-12-16T05:00:00+5:302021-12-16T05:00:16+5:30

यवतमाळातील अनेक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी ‘लोकमत’ने या हळव्या विषयावर संवाद साधला, तेव्हा सर्वांनीच मनातली खदखद मोकळी केली. पण, ताण कितीही असला तरी कामासाठी सदैव सज्ज असल्याचा निर्धारही व्यक्त केला. समाजातल्या आनंदाच्या उत्सवप्रसंगी सर्वांनाच सुरक्षा हवी असते. त्यासाठी पोलीस हवे असतात. पोलीस स्वत:चा आनंद बाजूला ठेवून बंदोबस्त लावतात.

Name the police ... but, you have to enjoy yourself, Olis | नाव पोलीस... पण, स्वत:चाच आनंद ठेवावा लागतो ओलीस

नाव पोलीस... पण, स्वत:चाच आनंद ठेवावा लागतो ओलीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पोलीस या शब्दातच मर्दुमकी ठासून भरलेली आहे. मात्र सरकारच्या कामचलाऊ धोरणाने खमक्या पोलिसांनाही मांजर करून टाकले आहे. १४-१४ तास काम केल्यावर घरी जाऊन दोन क्षण आनंदाचे भोगावे म्हटले तर, या पोलिसांना लगेच नव्या जबाबदारीसाठी कार्यालयातून फोन येतो. ती जबाबदारी संपत नाही तर, आणखी नवीन काम शिरावर येऊन पडते. त्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसविणारे पोलीस स्वत: मात्र प्रचंड ताण-तणावामुळे अंतर्मनातून नाखूश आहेत.
यवतमाळातील अनेक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी ‘लोकमत’ने या हळव्या विषयावर संवाद साधला, तेव्हा सर्वांनीच मनातली खदखद मोकळी केली. पण, ताण कितीही असला तरी कामासाठी सदैव सज्ज असल्याचा निर्धारही व्यक्त केला. समाजातल्या आनंदाच्या उत्सवप्रसंगी सर्वांनाच सुरक्षा हवी असते. त्यासाठी पोलीस हवे असतात. पोलीस स्वत:चा आनंद बाजूला ठेवून बंदोबस्त लावतात. मात्र त्यांना कधीही अशा आनंदोत्सवात सहभागी होता येत नाही. ड्युटीची वेळ तर ठरलेलीच नसते. सकाळी ९ वाजता ड्युटीवर हजर झालेला पोलीस रात्री नेमका किती वाजता मोकळा होईल याची शाश्वती कधीच नसते. १२ ते १४ तास सतत काम करताना कधी व्हीआयपी तर, कधी सर्वसामान्य नागरिकांचेही टोमणे निमूटपणे ऐकून घ्यावे लागतात. रात्री २ वाजता घरी परतलेल्या पोलिसाला संबंधित कामाचा रिपोर्ट सादर करण्यासाठी सकाळी ७ वाजताच पोलीस ठाण्यात हजर व्हावे लागते. ना कुटुंबीयांशी धड बोलता येते, ना त्यांच्या सुख दु:खात सहभागी होता येते. घर आणि ड्युटी या दोन्ही आघाड्यांवर पोलिसांच्या मनाची सतत ओढाताण होत आहे.

कामाचा ताण हा त्या-त्या पोलीस ठाण्याच्या व्यापावर अवलंबून असतो. आमच्या अवधूतवाडी ठाण्यात कामाचा व्याप मोठा आहे. शुक्रवारचीच गोष्ट सांगतो... मी सकाळी ९.३० वा. ऑफिसला आलो, तर थेट रात्री २.३० वाजता घरी जाऊ शकलो. घरी पोहोचत नाही तोच एसपी साहेबांचा फोन होता की शनिवारी सकाळी ९ वाजता मी आढावा घेणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी ९ च्या आधीच पुन्हा कामावर हजर झालो; पण कामातच खरी मजा आहे. एवढे मात्र खरे की आमच्या जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा हमखास चुकतात. त्यामुळे तब्येतीवर परिणाम होतो. मनाचे स्वास्थ्यही बिघडते. केवळ काम करून घरी जायचे असते तर ताण नसता; पण घरी गेल्यावरही डोक्यात अनेक गोष्टी असतात. त्याचे प्रेशर असते. त्यामुळे घरच्यांना क्वॉलिटी टाइम देता येत नाही.
- मनोज केदारे, ठाणेदार, अवधूतवाडी पोलीस ठाणे

ताण असो वा नसो काम तर करावेच लागेल. कामाचा व्याप कितीही असतो मी आजपर्यंत अनेकांना मदत केली. रात्री कितीही वाजता फोन आला तरी मी त्याच्यावर ओरडत नाही. त्याचे म्हणणे ऐकून घेतो. मात्र, अशा वेळी शांत राहताना मनावर ताबा ठेवताना ताण हा येणारच; पण ताण घेतल्याशिवाय काम होत नाही आणि काम केले तर ताण येत नाही. काम मन लावून केले तर काम सोपे होते. आता पोलिसांच्या घरच्या मंडळींनाही या सर्व बाबींची सवय झाली आहे. मी तर माझ्या कामाचे दोन भागच करून टाकले. घरी जाताना बाहेरच्या गोष्टी मी सोबत नेत नाही. बाहेरच्या गोष्टी बाहेर. आता तर अशी परिस्थिती आहे की, एक-दोन दिवस सुटी घेतली तरी मला करमत नाही. कारण मनाला रिकामपणाची सवयच नाही. योग्य टाइम मॅनेजमेंट केल्यास तणावरहित काम करणे सोपे आहे.
- प्रदीप शिरस्कार, पोलीस निरीक्षक, यवतमाळ

कामाच्या व्याप भरपूर असल्याने ताण येणे स्वाभाविकच आहे; पण त्यातल्या त्यात आम्ही काही उपाययोजना करीत असतो. साप्ताहिक सुटीच्या आदल्या दिवशी संबंधित कर्मचाऱ्याला रात्रपाळी दिली जात नाही. वाढदिवस असल्यास सुटी दिली जाते. घरात कुणाचे लग्नकार्य असल्यास बदली साप्ताहिक सुटीही दिली जाते. शिवाय ताण घालविण्यासाठी आम्ही दर मंगळवारी योगा-प्राणायाम करीत असतो. एसपी साहेबांनी अलीकडेच कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदल्या केल्या. त्यामुळे सर्वांना कुटुंबासोबत राहता येते.
- विनोद चव्हाण, 
ठाणेदार, पारवा

 

Web Title: Name the police ... but, you have to enjoy yourself, Olis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस