पंचांच्या नावावर हडपला निधी
By admin | Published: September 24, 2016 02:38 AM2016-09-24T02:38:44+5:302016-09-24T02:38:44+5:30
येथील जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे प्रताप माहिती अधिकारातून बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली असून
परजिल्ह्यातील दाखविले पंच : बोगस नावे आणि स्वाक्षऱ्याही
नीलेश भगत यवतमाळ
येथील जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे प्रताप माहिती अधिकारातून बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली असून आता बनावट पंचगिरी करून लाखो रुपयांचा निधी हडपल्याचे पुढे येत आहे. कागदोपत्री स्पर्धेत पंच म्हणून शिपाई आणि कर्मचाऱ्यांची नावे दिसून येत आहे.
२०१५-१६ च्या शालेय क्रीडा घेण्यात आली. सुब्रतो फुटबॉल आणि शालेय फुटबॉल स्पर्धेत सात पंच दाखविण्यात आले. त्यांना १२ हजार २०० रुपये मानधन वाटप केल्याचे देयक सादर केले. मात्र या सातही पंचांनी आॅगस्ट महिन्यात प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी प्रदीप शेटिये यांच्याकडे मानधन मिळाले नसल्याची तक्रार केली आहे. गतवर्षी जिम्नॅस्टिक या खेळात केवळ एकाच संघाची नोंद झाली होती. परंतु ही स्पर्धा दोन दिवस खेळविल्याचे दाखवून पाच पंचांचे मानधन पाच हजार रुपये काढण्यात आले. स्क्वॅश हा खेळ तर कागदोपत्रीच दाखवून पाच पंचाच्या नावावर तीन हजार रुपये हडपण्यात आल्याचे दिसून येते. सायकलिंग या खेळात केवळ तीन खेळाडू सहभागी झाले होते. केवळ ३० मिनिटात ही स्पर्धा आटोपली. मात्र आठ पंचांची फौज दाखवून त्यांच्या नावे ४८०० रुपयांचे बिल काढण्यात आले. हॅन्डबॉल व व्हॉलिबॉल या खेळाच्या आयोजनासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांचा निधी आहे. मात्र या दोनही खेळात पंच मानधनावर दहा हजार ८०० रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. बास्केटबॉल या खेळात पंचाची अनेक नावे बोगस असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यातील एका वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाचे नावही यासाठी वापरले आहे. बॅडमिंटन या खेळात तर एका विद्यमान आमदाराच्या पुत्राला पंच दाखवून त्याच्या नावावरही पैसे हडपल्याचे दिसून येते. अशा अनेक खेळात जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने पैसा हडपल्याचे प्रकरण उघडकीस आले.