नांदगव्हाण धरणाचे पुनर्निर्माण उभारणी लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 10:19 PM2018-02-09T22:19:37+5:302018-02-09T22:19:54+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदगव्हाण धरणाच्या पुननिर्मितीला लवकरच प्रारंभ होणार असून यासाठी साडेतेरा कोटी रुपये मंजूर झाले आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्याने या धरणाचे बांधकाम होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदगव्हाण धरणाच्या पुननिर्मितीला लवकरच प्रारंभ होणार असून यासाठी साडेतेरा कोटी रुपये मंजूर झाले आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्याने या धरणाचे बांधकाम होणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारे नांदगव्हाण धरण फुटल्यामुळे एकच हाहाकार उडाला होता. दिग्रस शहरातील १९ जणांचा महापुराने बळी घेतला होता. तेव्हापासून या धरणाची निर्मिती रखडली आहे. शहराला सतत ३० वर्ष या धरणातून पाणीपुरवठा झाला. तोही सायफन पद्धतीने. त्यामुळे विजेचा खर्चही बचत होत होता. परंतु शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या या प्रकल्पाकडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले. दरम्यानच्या काळात नगरपालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. त्याचा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच शासनाने साडेतेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी नगरपरिषदेला प्राप्तही झाला. परंतु तांत्रिक बाबींमुळे तो अखर्चित राहिला. दरम्यानच्या काळात संपदा बहुद्देशीय संस्थेने धरण पुनर्बांधणीसाठी समिती गठित करून पाठपुरावा सुरू केला.
अखेर सर्व प्रक्रिया पूर्ण करून निविदा काढण्यात आली. त्यातही चौथ्यांदा निविदा काढण्यात आली. यामध्ये आलेल्या निविदेला पडताळून आगामी नगरपालिका सभेत मंजुरी दिली जाईल. या धरणाचा बांधकाम कालावधी १८ महिन्याचा असल्याची माहिती मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी नांदगव्हाण धरण पुनर्निर्माण जागरण समितीच्या प्रतिनिधींना दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष सुरेंद्र मिश्रा, मजहर खान, अभय इंगळे, प्रकाश सातघरे, सुरेश चिरडे, किशोर कांबळे, अब्दूल रफिक, विष्णूपंत यादव आदी उपस्थित होते. यामुळे लवकरच दिग्रसकरांना नांदगव्हाण धरणाचे पाणी उपलब्ध होणार आहे.