पांढरकवडा तालुक्यातील नदी-नाल्यात ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:03 AM2018-01-22T00:03:09+5:302018-01-22T00:03:20+5:30
तालुक्यातून वाहणाऱ्या खुनी नदीसह नदी-नाले आत्तापासूनच कोरडे पडले असून उन्हाळ्यापूर्वीच पाणी समस्या भेडसावणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्यातून वाहणाऱ्या खुनी नदीसह नदी-नाले आत्तापासूनच कोरडे पडले असून उन्हाळ्यापूर्वीच पाणी समस्या भेडसावणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा योजना आहे. ग्रामपंचायतीमार्फत ही पाणी पुरवठा राबविली जाते. परंतु नळयोजनेच्या ज्या गावांना पाणी पुरवठा होतो, त्या गावातील विहिरीच्या पाण्याची पातळीसुद्धा खाली गेली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्या आहेत. सिंचनाअभावी रबी पिकांना पाणीही देता आले नाही. त्यामुळे रबी पिकांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. गुरांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. खुनी नदीला फेब्रुवारीपर्यंत तरी काही ना काही थोड्या प्रमाणात पाणी असायचे. परंतु खुनी नदीही जानेवारीच्या उत्तरार्धातच कोरडी पडली आहे. आतापासूनच पाण्याची समस्या जाणवू लागल्यामुळे उन्हाळ्यात ही समस्या अधिकच तीव्र होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
पाणी टंचाई निवारणार्थ दरवर्षी आढावा बैठका घेतल्या जातात. आराखडे केल्या जातात. परंतु पाणी टंचाई निवारणार्थ करावयाची कामे आधी केल्या जात नाही. पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यानंतरच टंचाई निवारणार्थ उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे तालुक्याला दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
मागीलवर्षी देखिल तालुक्यातील साखरा, वाढोणा, करंजी, घोन्सी पोड, मरेगाव वन, भाडउमरी, बोथ, सोनुर्ली, अर्ली, मंगी, बहात्तर, वाºहा, कवठा आदी गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. पाणी टंचाई संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये वरील गावांसाठी उपाययोजना करण्यासाठी कामेदेखिल प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु यापैकी अनेक गावातील कामे प्रत्यक्षात झालीच नसल्याने उन्हाळ्यापूर्वीच ग्रामस्थांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.