Nashik Bus Accident : अपघातानंतर आरटीओला जाग; ट्रॅव्हल्सची तपासणी सुरू

By सुरेंद्र राऊत | Published: October 8, 2022 03:43 PM2022-10-08T15:43:35+5:302022-10-08T15:58:48+5:30

पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; नाशिकच्या घटनेनंतर उडाली तारांबळ

Nashik Bus Accident: yavatmal guardian minister sanjay rathod orders inquiry of horrific bus accident in nashik | Nashik Bus Accident : अपघातानंतर आरटीओला जाग; ट्रॅव्हल्सची तपासणी सुरू

Nashik Bus Accident : अपघातानंतर आरटीओला जाग; ट्रॅव्हल्सची तपासणी सुरू

Next

यवतमाळ : जिल्ह्यातून पुणे, मुंबई, हैद्राबाद या महानगरात जाण्यासाठी एसटी बसशिवाय खासगी ट्रॅव्हल्स हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचा हब यवतमाळात आहे. मोठी आर्थिक उलाढाल यातून होते. ट्रॅव्हल्सच्या एकूणच सुरक्षेकडे परिवहन विभागाचे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. नाशिक येथे यवतमाळच्या चिंतामणी ट्रॅव्हल्सचा शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. यात १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर आरटीओ प्रशासनाला जाग आली. मोटर वाहन निरीक्षकांचे पथक शनिवारी यवतमाळच्या ट्रॅव्हल्स पॉईंटवर तपासणीसाठी पोहोचले.

यवतमाळातून मुंबईसाठी शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता एम.एच.२९/ए.डब्ल्यू.३१०० ही ट्रॅव्हल्स निघाली. ऑनलाइन बुकिंग प्रमाणे ३० प्रवासी यवतमाळातून बसले होते. ही ट्रॅव्हल्स आर्णी, दिग्रस, पुसद, वाशिम, मेहकर मार्गे मुंबईकडे जात असताना नाशिकजवळअपघात झाला. 

Nashik Bus Accident: चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी?; दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

मुंबईला जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये मजूर व कामगार वर्गाचाच समावेश असतो. इतर प्रवासी धामणगाव येथून रेल्वेने मुंबई गाठतात. त्यामुळे गरीब वर्गाची अडचण ओळखून ट्रॅव्हल्स चालक व वाहकाकडून रस्त्यावर मिळेल त्या प्रवाशाला ट्रॅव्हल्समध्ये बसविले जाते. यातूनच अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा १८ प्रवासी जास्त असल्याचे आढळून आले.

Nashik Bus Accident: बस दुर्घटनेवर पंतप्रधानांनी व्यक्त केली हळहळ; मृतांच्या वारसांना २ लाख जाहीर

पालकमंत्री संजय राठोड यांनीसुद्धा चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यावरून आरटीओचे मोटर वाहन निरीक्षक संदीप मुखे, सहायक निरीक्षक सतीश टुले, दिव्येश उब्हाळे हे ट्रॅव्हल्स पॉईंटवर पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सची मालकाकडून माहिती घेतली. एम.एच.२९/ए.डब्ल्यू.३१०० ही ट्रॅव्हल्स आरटीओकडे ३ सप्टेंबर २०१६ मध्ये नोंदणीकृत झाली आहे. या ट्रॅव्हल्सचे फिटनेस ६ डिसेंबर २०२२ पर्यंत असल्याचे मोटर वाहन निरीक्षक संदीप मुखे यांनी सांगितले. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये दोन चालक होते. अपघाताच्या घटनेपूर्वी अर्धा तास अगोदर ही ट्रॅव्हल्स एका ढाब्यावर चहापाणासाठी थांबली. त्यावेळी चालक दिलीप शेंडे याने सहकारी चालक ब्रह्मा मनवर याला वाहन चालवण्यासाठी दिले. तेथून अर्ध्या तासात हा अपघात घडला. यात ब्रह्मा मनवर याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

आरटीओ अधिकाऱ्याचीच ट्रॅव्हल्समध्ये भागिदारी

यवतमाळात प्रतिनियुक्तीवर आलेल्या वाहन निरीक्षकांच्याच दोन ट्रॅव्हल्स आहे. हा वाहन निरीक्षक पूर्णवेळ ट्रॅव्हल्स पॉईंटवर बसतो. तेथे त्याने दुकान थाटले आहे. या अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काही महिन्यापूर्वी ट्रॅव्हल्सच्या अनधिकृत प्रकारावरून दम दिला होता. मात्र खात्यातील वरिष्ठांची मेहरबानी असल्याने हा अधिकारी येथेच ठाण मांडून आहे. नाशिकच्या अपघात घटनेनंतर आरटीओतील अनागोंदी आता आव्हान बनली आहे.

स्लिपर काेचसाठी आरटीओचे ४० मानांकन

स्लिपर कोच ट्रॅव्हल्स पासिंग करताना आरटीओकडून ४० प्रकारचे निकष तपासले जातात. यात सर्वप्रथम वाहनाला स्पिड गव्हर्नर आवश्यक आहे. वेगमर्यादा ८० ठेवावी लागते. जीपीएस आवश्यक आहे. एसी वाहन असेल तर प्रत्येक खिडकीजवळ काच फोडण्यासाठी टूल हवे. एमर्जनी एक्झिट दरवाजा कार्यरत हवा. मागच्या बाजूचा मोठा ग्लास फोडण्यासाठी सुविधा हवी. इतकेच नव्हेतर पॅनिक बटणची सक्ती आहे. अशा ४० प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. याशिवाय ट्रॅव्हल्स कंपनीकडून सीसीटीव्ही सुरक्षेसाठी लावले जाते.

यवतमाळातून ३० प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये बसले होते. रस्त्यात अतिरिक्त प्रवासी बसविण्यात आले. ही घटना अतिशय दुर्दैवी असून याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. नाशिक जिल्हाधिकारी व यवतमाळ जिल्हा प्रशासन समन्वय ठेवून आहे. जखमींना योग्य उपचार मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. घटनेत दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसे आदेश दिले आहे.

- संजय राठोड, पालकमंत्री, यवतमाळ

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Nashik Bus Accident: yavatmal guardian minister sanjay rathod orders inquiry of horrific bus accident in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.