राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ झालाय खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:48 AM2021-08-18T04:48:57+5:302021-08-18T04:48:57+5:30
तालुक्यातील पिंपळखुटी ते करंजी एकूण ५५ किलोमीटर रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले आहे. याकडे मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ...
तालुक्यातील पिंपळखुटी ते करंजी एकूण ५५ किलोमीटर रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले आहे. याकडे मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता बनवून एक ते दोन वर्षे कालावधी पूर्ण होत नाही तर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. करोडो रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या महामार्गावरील रस्त्यावर एक वर्षाचा कालावधी संपत नाही तर संपूर्ण तालुक्यात लाभलेला पिंपळखुटी ते करंजी असा एकूण ५५ किलोमीटरचा रस्ता खड्डेमय झाल्याने या रस्त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याने या रस्त्याची सखोल चौकशी न करता आपसी देवाण-घेवाण करून हा रस्ता उत्तम दर्जाचा झाला असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याचे समजते. करंजी ते पिंपळखुटी या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर एक ते दीड फुटाचे मोठमोठे खड्डे पडले असताना कोणत्याही अधिकाऱ्याने याकडे आतापर्यंत लक्ष दिले नाही. पिंपळखुटी ते करंजी या ग्रामीण भागातील लोकांकरिता मुख्य बाजारपेठ पांढरकवडा शहर असून येथे येण्याकरिता लहान वाहनांचा वापर करण्यात येत असतो. मात्र, मोठेमोठे खड्डे पडल्यामुळे अनेक लहान वाहनांना चांगलाच त्रास सहन करावा लागत असून खड्डे चुकवताना याआधीपण अनेक अपघात झालेले आहेत. तसेच मोठ्या वाहनांचेसुद्धा हेच हाल असून हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ काश्मीर ते कन्याकुमारी मोठ्या लांब पट्ट्याचा असल्यामुळे अनेक राज्यातील मोठी वाहने या मार्गावर धावत असतात. मोठे वाहन सुसाट वेगाने धावत असताना खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक मोठे अपघात व पलटी झालेली घटना याठिकाणी वारंवार होत असतात. तरीसुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्याकडून कोणतेही दखल घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.