राष्ट्रीय महामार्ग कागदावरच
By admin | Published: September 17, 2015 03:04 AM2015-09-17T03:04:04+5:302015-09-17T03:04:04+5:30
केंद्र सरकारच्या परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने करंजी-वणी ते वरोरा-चंद्रपूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची घोषणा केली.
केवळ घोषणा : विकासाला ब्रेक, अद्याप कामाला सुरूवातही नाही
वणी : केंद्र सरकारच्या परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने करंजी-वणी ते वरोरा-चंद्रपूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची घोषणा केली. मात्र हा महामार्ग अद्याप कागदावरच आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाल्यानंतर त्या दिशेने या मार्गावर कोणतेही काम सुरू झाले नसल्याने जिल्ह्याच्या विकासाला लागलेला ‘ब्रेक‘ अद्याप कायमच आहे.
केंद्र सरकारच्या परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाअंतर्गत देशात रस्त्यांचे जाळे विणले जाते. राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात येते. सोबतच देशातील राष्ट्रीय महामार्गाची देखभाल आणि दुरूस्तीही केली जाते. यवतमाळ जिल्ह्यातून एकमेव वाराणसी-कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात गेला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातून हा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात पोहोचतो. वडकी नजिकच्या कारेगाव येथील वर्धा नदीवरील पुलापासून ते तेलंगणाची सीमा असलेल्या केळापूर तालुक्यातील पिंपळखुटीपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यात येतो. जवळपास केवळ ५५ किलोमीरटचा हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जातो.
यवतमाळ जिल्हा आधीच रेल्वेपासून वंचित आहे. त्यातही आता ब्रिटीशकालीन ‘शकुंतला‘ही ठप्प पडली आहे. केवळ वणीतून नागपूर-मुंबई ही एकमेव नंदीग्राम एक्सप्रेस उपलब्ध आहे. वणीवरून धावणाऱ्या इतर दोन रेल्वेंचा जिल्ह्यात कुठेही थांबा नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना रस्ते मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र जिल्ह्यातून नव्याने घोषित झालेला राष्ट्रीय महामार्ग गेल्यास सुखकर प्रवासासोबतच विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
केळापूर तालुक्यातील करंजीपासून वणी, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, मूल, गडचिरोली, धानोरामार्गे नवीन राष्ट्रीय महामार्ग छत्तीसगड राज्याला जोडण्याचे प्रस्तावीत आहे. या महामार्गाला ९३0 असा क्रमांक देण्यात आला. हा महामार्ग केवळ २८0 किलोमीटरचा राहणार आहे. त्यापैकी ४0 किलोमीटरचा मार्ग जिल्ह्यातून जाणार आहे. करंजीवरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात गेला आहे. तेथूनच या नवीन महामार्गाची सुरूवात होणार आहे. करंजीपासून वणीपर्यंतच्या राज्य मार्गाचे गेल्या पाच वर्षांपासून चौपदरीकरण सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे.
घुग्गुस-चंद्रपूर मार्गाचेही चौपदरीकरण सुरू आहे. करंजी-मारेगाव ते वणी हा मार्ग आता नवीन राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट होणार आहे. समोर वरोरापर्यंत हा नवीन राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. मात्र वणीपासून ते पाटाळा पुलापर्यंत सध्या हा रस्ता अत्यंत दयनीय स्थितीत आहे. हाच रस्ता राष्ट्रीय महामार्गात समविष्ट होणार आहे, असे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही. करंजी ते पाटाळापर्यंतचा ४0 किलोमीटरचा हा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ चे काम रखडले
यवतमाळ जिल्ह्यातून तूर्तास वाराणसी ते कन्याकुमारी हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गाची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. वडकी ते हिंगणघाट दरम्यान तर मोठमोठे खड्डे पडले आहे. गेल्या पाच वर्षांपासून या महामार्गाच्या दुरस्तीचे काम सुरू आहे. मात्र ते प्रचंड रेंगाळले आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे. वडकी, पोहणानजिक असलेले खड्डे छोट्या चारचाकी वहनांसाठीही डोकेदुखी ठरले आहे. त्यामुळे अवजड वाहने वगळता इतर वाहने या मार्गाने नेण्याचे चालक टाळत आहे. नवीन राष्ट्रीय महामार्ग अद्याप कागदावर आहे अन् जुना महामार्ग आचके देत आहे, अशी ही स्थिती आहे. महामार्गाची दुर्दशा झाल्याने जिल्ह्याच्या विकासालाही ‘ब्रेक‘ लागला आहे.