राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण; तरीही वाहनधारकांना बसतोय टोलचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 10:01 PM2022-10-15T22:01:53+5:302022-10-15T22:02:35+5:30

तत्कालीन प्रकल्प संचालकांनी चुकीचा अहवाल पाठविल्यामुळे शेतकरी योग्य मोबदल्यासाठी उच्च न्यायालयात गेले आहे. निर्णय न्यायप्रविष्ट असल्यामुळे दोन किलोमीटर अंतरात अद्याप रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहे. नांदेडवरून निघालेले वाहन अतिशय खडतर रस्त्याने प्रवास करत, भांब येथील टोल नाक्यापर्यंत येत आहे. वाहनधारकांना वाहतुकीयोग्य रस्ता मिळत नाही. मात्र, त्यांना टोल भरावा लागत आहे. हा अन्याय असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

National Highway work incomplete; Still the motorists are facing the burden of toll | राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण; तरीही वाहनधारकांना बसतोय टोलचा भुर्दंड

राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण; तरीही वाहनधारकांना बसतोय टोलचा भुर्दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : नागपूर-बोरी-तुळजापूर या नॅशनल हायवे ३६१ चे महागाव ते वारंगा रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे, परंतु या रस्त्यावरून समोर नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांना नाहक टोल द्यावा लागत आहे. 
रस्ता पूर्ण होण्याआधीच महागाव ते यवतमाळ रस्त्यावर दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली. रस्ता अपूर्ण असताना, टोलचा भुर्दंड भरावा लागत असल्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ‘नॅशनल हायवे की मृत्यूचा सापळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले. महागाव ते वारंगा दरम्यान काम करणाऱ्या एजन्सीचे कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. याच रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि बायपास रस्त्यावरील कामे सुरळीत करण्यासाठी नव्याने निविदा बोलावण्यात आली आहे.
महागाव ते यवतमाळ रस्त्यावरील हिवरा संगम येथील बायपासवर असलेल्या शेतकऱ्यांचा तत्कालीन प्रकल्प संचालकांनी चुकीचा अहवाल पाठविल्यामुळे शेतकरी योग्य मोबदल्यासाठी उच्च न्यायालयात गेले आहे. निर्णय न्यायप्रविष्ट असल्यामुळे दोन किलोमीटर अंतरात अद्याप रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहे. नांदेडवरून निघालेले वाहन अतिशय खडतर रस्त्याने प्रवास करत, भांब येथील टोल नाक्यापर्यंत येत आहे. वाहनधारकांना वाहतुकीयोग्य रस्ता मिळत नाही. मात्र, त्यांना टोल भरावा लागत आहे. हा अन्याय असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
महागाव ते वारंगा हा रस्ता नॅशनल हायवे प्रकल्प संचालक नांदेड कार्यालयांतर्गत येतो. प्रकल्प संचालकांचा वेळकाढूपणा वाहनधारकांची डोकेदुखी बनला आहे. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे चार वर्षांपासून रस्त्यावरील एकही पूल पूर्णत्वाला गेला नाही. त्यामुळे नांदेड ते नागपूर जाणारे वाहनधारक केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडू लागले आहेत.

अर्धवट महामार्गामुळे वाहतूक कोंडी
- उमरखेड : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग उमरखेड शहराच्या बाहेरून जातो. ढाणकी रस्त्याला क्रॉस करणाऱ्या जागी हा महामार्ग अर्धवट आहे. उड्डाणपूलही अर्धवट आहे. त्यामुळे तीनही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना वाहन समोर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी या ठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे.
- नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. कंपनी निकृष्ट आणि अर्धवट काम करीत असून महामार्गाचे काम वाऱ्यावर सोडून कंपनी कामात वेळखाऊपणा करीत आहे. यापूर्वी हदगाव तालुक्यातील गोजेगाव पुलाजवळ रात्रभर वाहतूक ठप्प पडली होती. गोजेगाव येथेसुद्धा पुलाचे काम अर्धवट पडलेले आहे. तेथील रस्ता हा चिखलमय झाला आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यात साचलेल्या चिखलात रात्रभर ट्रक अडकला होता. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना संपूर्ण रात्र अडकून पडावे लागले होते.

 

Web Title: National Highway work incomplete; Still the motorists are facing the burden of toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.