जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा
By admin | Published: November 18, 2015 02:48 AM2015-11-18T02:48:22+5:302015-11-18T02:48:22+5:30
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सोमवारी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यवतमाळ : जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सोमवारी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरूवातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश गोरख, ज्येष्ठ पत्रकार प्रा. न. मा. जोशी, दिनेश गंधे, पद्माकर मलकापुरे, अनिरूद्ध पांडे, लक्ष्मण खत्री, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, आरती गंधे, संदीप खडेकर, जलालुद्दीन गिलाणी, श्रीकांत राऊत, धनंजय खारोकर, रघुवीरसिंह चव्हाण, निलेश भगत, शाकीर अहमद, सय्यद मतीन शेख, छायाचित्रकार वासुदेव भुटाणी यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण एका व्यंगचित्रासाठी दिवसभर फिरायचे. प्रचंड अभ्यास व्यंगांसाठी ते करत. त्यानंतर व्यगंचित्र तयार होत असे. एका लेखाइतकेच व्यंगचित्राचे महत्त्व आहे. अनेक बाबी केवळ व्यंगचित्रातून व्यक्त होत असल्याने अशा चित्रांना फार महत्त्व आहे, असे जोशी म्हणाले.
पत्रकारिता धर्म आहे. परंतु अलिकडे तो धंदा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपणास लाभलेला पत्रकारितेचा वारसा आपण टिकविला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी अध्यक्ष नागेश गोरख, ज्येष्ठ पत्रकार दिनेश गंधे, पद्माकर मलकापुरे, अनिरूद्ध पांडे यांचीही भाषणे झाली. मलकापुरे यांनी चांगला दृष्टिकोन ठेवून पत्रकारिता करावी, असे सांगितले. गोरख यांनी पत्रकार सुरक्षा कायदा व पत्रकारांना पेन्शन मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. गंधे यांनी शेतकरी आत्महत्येसारख्या सामाजिक प्रश्नाला पत्रकारांनी वाचा फोडल्याचे सांगून पत्रकारांची बाजू समजून घेणारे एखादे मंडळ असावे, असे सांगितले. पांडे यांनी अनेक व्यंगचित्रांचा दाखला देत त्याचे महत्त्व पटवून सांगितले.
कार्यक्रमामागची भूमिका जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनी प्रास्ताविकातून विशद केली. आभार श्रीकांत राऊत यांनी मानले.
(स्थानिक प्रतिनिधी)