राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष : फुगडी, लंगडी अन् कबड्डी होणार शिक्षणाचाच भाग
By अविनाश साबापुरे | Published: August 29, 2023 12:14 PM2023-08-29T12:14:15+5:302023-08-29T12:22:49+5:30
रोज होणार खेळाची तासिका : क्रीडा शिक्षणासोबत परीक्षाही घेतली जाणार अन् गुणही देणार
अविनाश साबापुरे
यवतमाळ : नुसता खेळत राहतो, पास कसा होणार? असे टोमणे लहानपणी तुम्हीही खाल्ले असतीलच. पण यापुढे अभ्यासासोबतच खेळतही जा... असा सल्ला विद्यार्थ्यांना ऐकायला मिळणार आहे. कारण आतापर्यंत केवळ ‘को-करिक्युलर ॲक्टिव्हिटी’ असे दुय्यम स्थान मिळालेल्या खेळाला अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग म्हणून महत्त्व येणार आहे. फुगडी, लंगडी, कबड्डीसारखे पारंपरिक खेळही शिक्षणाचा भाग होणार आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येकच विद्यार्थ्याच्या क्रीडानैपुण्याची परीक्षाही घेतली जाणार आहे.
नव्या शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी २३ ऑगस्ट रोजी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा’ अधिकृतरीत्या जाहीर केला. त्यात गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान, भाषा या अभ्यासक्रमांसोबतच ‘क्रीडा’ हा आवश्यक विषय म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. या आराखड्यात केवळ ‘शारीरिक शिक्षण’ असे न म्हणता ‘शारीरिक शिक्षण व उत्तम जडणघडण’ (फिजिकल एज्युकेशन ॲन्ड वेलबिईंग) असा व्यापक विषय घेण्यात आला आहे. शाळेच्या वेळापत्रकात इतर विषयांप्रमाणे खेळाचीही तासिका ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
फाउंडेशन स्टेजचे संपूर्ण शिक्षणच खेळण्यांच्या आधारे दिले जाणार आहे. तर प्रिपरेटरी, मिडल आणि सेकंडरी (तिसरी ते बारावी) वर्गांसाठी एका सत्रात १५० खेळांच्या तासिका अनिवार्य आहेत. इतर विषयांप्रमाणे खेळ या विषयाचीही सर्वच वर्गांची परीक्षाही घेतली जाणार आहे. ही परीक्षा कशी घ्यावी आणि त्याचे गुणदान कसे करावे, याचाही आराखडा देण्यात आला आहे. त्यामुळे खेळा आणि गुण मिळवा, असे आता पालक म्हणणार आहेत.
त्यामुळेच प्रत्येक शाळेला मैदान असावे, ते नसल्यास उपलब्ध करावे, खेळांची केवळ पुस्तकी ‘थिअरी’ न सांगता शिक्षकांनी प्रत्यक्ष ‘खेळण्या’स वाव द्यावा, प्रत्येक शाळेकडे खेळाचे अद्ययावत साहित्य, प्रशिक्षित क्रीडा शिक्षक असलेच पाहिजेत, असाही आग्रह अभ्यासक्रम आराखड्यात धरण्यात आला आहे. जोपर्यंत क्रीडा शिक्षकांची नेमणूक होत नाही, तोपर्यंत शाळेतील सध्याच्या शिक्षकांना अन्य क्रीडा शिक्षकांकडून प्रशिक्षित करण्यात यावे, असेही म्हटले आहे.
खेळांसोबतच ‘सर्कल टाइम’ ही एक संकल्पना मांडण्यात आली आहे. खेळ सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी वर्तुळाकार बसून खेळाबाबत या ‘सर्कल टाइम’मध्ये चर्चा करायची आहे. विद्यार्थी विकासासाठी क्रिकेट, व्हाॅलिबाॅल, हाॅकी अशा खेळांसोबतच देशी आणि स्थानिक पारंपरिक खेळांचाही आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. कबड्डी, फुगडी, टनेल बाॅल अशा आउटडोअर खेळांसोबतच चौसर, चेस, सापशिडी, लुडो या इनडोअर खेळांचीही माहिती आराखड्यात देण्यात आली आहे.
क्रीडा शिक्षणापुढील आव्हाने
- अभ्यासक्रम आराखड्यात सध्या शालेय खेळांची अत्यंत विदारक अवस्था असल्याचे म्हटले आहे.
- खेळ म्हणजे ‘मधल्या सुट्टी’तील टाइमपास मानले जाते.
- एखादा शिक्षक सुट्टीवर असल्यास विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी खेळाकडे पाहिले जाते.
- बहुतांश शाळांकडे क्रीडा साहित्यच नाही
- आउटडोअर खेळांसाठी पुरेसे मैदान नाही
- इनडोअर खेळांसाठी हाॅल नाही
- बहुतांश शाळांकडे प्रशिक्षित क्रीडा शिक्षकच नाही
- क्रीडा शिक्षकाशी संबंधित लिखित स्वरुपातील साहित्याची कमतरता
- क्रीडा शिक्षणासाठी आवश्यक आहाराबाबत जागृती नाही
- बहुतांश शाळांकडे प्रशिक्षित क्रीडा शिक्षकच नाही
- क्रीडा शिक्षणाशी संबंधित लिखित स्वरूपातील साहित्याची कमतरता
- क्रीडा शिक्षणासाठी आवश्यक आहाराबाबत जागृती नाही