राष्ट्रवादी काँग्रेस उतरली रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:25 PM2017-12-01T23:25:15+5:302017-12-01T23:25:36+5:30
सरकार के खिलाफ हल्लाबोल... आपकी आवाज हल्लाबोल... इस विदर्भ की आवाज हल्लाबोल... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रचंड आवेशात शुक्रवारी येथून हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सरकार के खिलाफ हल्लाबोल... आपकी आवाज हल्लाबोल... इस विदर्भ की आवाज हल्लाबोल... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रचंड आवेशात शुक्रवारी येथून हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात करण्यात आली. राकाँच्या सदैव गरजणाऱ्या ‘तोफा’ यवतमाळात एकवटल्या होत्या. यवतमाळातून शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार अशा विविध घटकांच्या समस्यांची बारूद घेऊन या तोफा नागपूरकडे रवाना झाल्या.
माजी कृषीमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यातच यवतमाळात येऊन सरकारविरुद्ध आवाज उठविला होता. हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल करण्यासाठी शेतकºयांची दिंडी काढणार असल्याची घोषणाही तेव्हाच पवार यांनी केली होती. त्यानुसार, शुक्रवारी येथील समता मैदानातून हजारो शेतकºयांची पदयात्रा घोषणा देत निघाली. समता मैदानासह संपूर्ण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यांची लक्षणीय संख्या दिसली. पक्षाच्या टोप्या घालून हाती मागण्यांचे फलक घेतलेले शेतकरी सरकारविरुद्ध जोरदार घोषणा देत होते.
पदयात्रा निघण्यापूर्वी समता मैदानावर राज्याच्या, विदर्भाच्या आणि विशेषत: यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर जागर करण्यात आला. ताजे आणि गंभीर असलेले शेतकरी विषबाधा, कपाशीवरील बोंडअळीच्या मुद्द्यांवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढविण्यात आला. फवारणीतून शेतकºयांना विषबाधा झाल्यावर मुख्यमंत्र्यांना यवतमाळात लपत-छपत का यावे लागले, असा बोचरा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तर ‘मी लाभार्थी’ अशा जाहिराती देऊन मुख्यमंत्री जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
जिल्ह्यातील विषबाधा, आत्महत्याग्रस्त शेतकºयांना श्रद्धांजली
राज्याच्या शेतीला नवी दिशा देणारे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जिल्ह्यातून जाणीवपूर्वक आंदोलन सुरू करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले. हल्लाबोल पदयात्रेला सुरूवात करण्यापूर्वी जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना तसेच फवारणीदरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यासाठी संपूर्ण समता मैदानातील हजारो शेतकरी, कार्यकर्ते अत्यंत शांततेत उभे राहिले.
नेत्यांच्या नारेबाजीला उत्स्फूर्त प्रतिसाद
यवतमाळातून पदयात्रा सुरू करण्यापूर्वी जाहीर सभेत नेत्यांनी हल्लाबोल आंदोलनातील नारे शेतकऱ्यांकडून वदवून घेतले. बोल रे बोल हल्ला बोल, महंगाईपर हल्लाबोल, बेरोजगारीपर हल्लाबोल, सरकार नाही भानावर राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर असे नारे यावेळी दणाणत होते. सभा संपून पदयात्रेला प्रारंभ होताना मात्र आमदार प्रकाश गजभिये यांनी अत्यंत तिखट घोषणा दिली. सरकार नाही भानावर लावा त्यांच्या कानावर, या घोषणेनेला मात्र प्रचंड प्रतिसाद मिळत होता.