घोटाळेबाज जगन राठोडला राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय

By Admin | Published: August 25, 2016 01:43 AM2016-08-25T01:43:11+5:302016-08-25T01:43:11+5:30

जिल्हा परिषदेत गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त ठरलेले आणि साहित्य खरेदीमुळे घोटाळ्यांच्या आरोपात अडकलेले कृषी विकास अधिकारी

Nationalist Congress Party's Abhay, Jagan Rathod | घोटाळेबाज जगन राठोडला राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय

घोटाळेबाज जगन राठोडला राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय

googlenewsNext

जिल्हा परिषद : प्रवीण देशमुखांचा गटनेते पदाचा राजीनामा
यवतमाळ : जिल्हा परिषदेत गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त ठरलेले आणि साहित्य खरेदीमुळे घोटाळ्यांच्या आरोपात अडकलेले कृषी विकास अधिकारी जगन राठोड यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच पाठबळ दिले जात आहे. नेतेच पाठीशी असल्याने राठोड यांच्याबाबत कारवाईची भूमिका घेताना जिल्हा परिषद अध्यक्षांचीही कोंडी होते. दरम्यान अशाच पक्षांतर्गत कोंडीतून जिल्हा परिषद सदस्य प्रवीण देशमुख यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. देशमुखांनी रेकॉर्डवर मात्र ‘वैयक्तिक’ असे कारण नमूद केले आहे.
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी जगन राठोड यांचा सन २०१२ पासून कारभार गाजतो आहे. गेल्या चार वर्षात कृषी विभागात विविध योजनेच्या निधीतून सुमारे ४० ते ५० कोटींच्या साहित्याची खरेदी केली गेली. सुरुवातीची दोन-तीन वर्षे या खरेदीतील ‘मलिदा’ कार्यालयातच जिरत होता. त्यात दिल्लीमेड साहित्य पुरवठादाराचे कनेक्शन लावून देणारा एक दलालही ‘वाटेकरी’ होता. मात्र काही पावत्या दृष्टीस पडल्याने एडीओ आणि दलालाच्या संगनमताने होणाऱ्या या खरेदीचा भंडाफोड झाला. तेव्हापासून हा दलालही एडीओंना सोडून पदाधिकाऱ्यांच्या आश्रयाला गेला.
हिस्सेवाटणीवरुन त्यांच्यात वाद झाल्याचे सांगितले जाते. पदाधिकाऱ्यांनी साहित्य खरेदीचे आकडे, पुरवठादार आणि गुणवत्तेवर नजर फिरविली असता त्यांचे डोळेच विस्फारले. तेव्हापासून चौकशीचा ससेमिरा जगन राठोड यांच्या मागे लागला. त्यातच त्यांच्या बोलण्या-वागण्याच्या पद्धतीने या चौकशीत आणखी तेल ओतले.
याच जगन राठोड यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने खुले पाठबळ दिले आहे. सुरुवातीपासूनच हा गट त्यांच्या कारवायांवर पडदा टाकतो आहे. अधून-मधून जगन राठोड हे काँग्रेसच्याही येथील एका बड्या नेत्याच्या आश्रयाला असतात. स्थायी समितीच्या बैठकीच्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षांना समाजाच्या कार्यक्रमात गुंतवून ठेवणे, त्याआड त्यांना बैठकीला गैरहजर ठेवणे, अध्यक्षाचा प्रभार थेट सभापतीला देणे, चौकशी समितीत सोईच्या सदस्यांचा शिरकाव करून घेणे हा राष्ट्रवादीतील पाठबळाच्याच रणनितीचा एक भाग असल्याचे सांगितले जाते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षही जगन राठोड यांच्या कारभारावर खूश नाहीत. मात्र नेतेच पाठीशी असल्याचे पाहून त्यांचाही कारवाईचा निर्णय घेताना हात थरथरत असल्याचे जिल्हा परिषदेत बोलले जाते.
दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सदस्य प्रवीण देशमुख यांनी गटनेते पदाचा राजीनामा पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे सोपविला आहे. त्यात वैयक्तिक कारण नमूद असले तरी वादग्रस्त व घोटाळेबाज अधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या एका गटाकडून मिळणारे पाठबळ ही मुख्य सल या राजीनाम्यामागे असल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)

नेत्यांपुढे अध्यक्ष, प्रशासनाची झाली कोंडी
जगन राठोड यांच्या साहित्य खरेदीतील फाईलींची प्रामाणिकपणे तपासणी झाल्यास त्यांच्यावर फसवणूक, अफरातफर, विश्वासघात या सारखे गंभीर गुन्हे नोंदवावे लागतील, अशी स्थिती आहे.
उमरखेडमधील सेवेमुळे प्रशासनावरही नेत्यांचा प्रभाव असल्याचे व त्यामुळेच ते कारवाईची ठोस भूमिका घेत नसल्याचा सूर राजकीय गोटातून ऐकायला मिळतो आहे.
कधी राष्ट्रवादीतून तर कधी काँग्रेसमधून मिळणाऱ्या पाठबळामुळेच जगन राठोड यांचे आर्थिक कारनामे आतापर्यंत तरी फौजदारीच्या कक्षेत आलेले नाहीत. त्यांचे राजकीय लागेबांधे पाहता सध्या तरी तशी चिन्हे नाहीत. त्यामुळेच जिल्हा परिषदेतील दोन अनुभवी पदाधिकाऱ्यांचा राठोड यांच्या विरोधातील सूर व्यर्थ ठरतो आहे.

Web Title: Nationalist Congress Party's Abhay, Jagan Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.