‘झेडपी’च्या सत्तेतून राष्ट्रवादी ‘आऊट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:23 PM2019-06-21T22:23:42+5:302019-06-21T22:24:21+5:30
गेली सव्वादोन वर्ष सत्तेची चव चाखलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शुक्रवारी अखेर जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडावे लागले. त्याच वेळी शिवसेनेची सत्तेत एन्ट्री झाली. पांढरकवडा तालुक्यातील गजानन बेजंकीवार व दारव्हा तालुक्यातील कालिंदा पवार या शिवसेनेच्या सदस्यांची जिल्हा परिषद सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेली सव्वादोन वर्ष सत्तेची चव चाखलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शुक्रवारी अखेर जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडावे लागले. त्याच वेळी शिवसेनेची सत्तेत एन्ट्री झाली. पांढरकवडा तालुक्यातील गजानन बेजंकीवार व दारव्हा तालुक्यातील कालिंदा पवार या शिवसेनेच्या सदस्यांची जिल्हा परिषद सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
शुक्रवारी शिवसेनेच्या सदस्यांची एका ठिकाणी बैठक पार पडली. युतीकडे ३८ सदस्य असल्याने सभापतींच्या दोन्ही पदांवर दावा ठोकण्याचा निर्णय सेनेच्या या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत गजानन बेजंकीवार व कालिंदा पवार यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केले. अन्य कुणाचाही अर्ज नसल्याने यवतमाळचे एसडीओ तथा पीठासीन अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी या दोघांच्याही बिनविरोध निवडीची घोषणा केली. या सभेकडे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पाठ फिरविली. एवढेच नव्हे तर खुद्द अध्यक्षही या सभापती निवडीच्या वेळी गैरहजर होत्या.
जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे बांधकाम व अर्थ सभापती निमीष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती अपक्ष नंदिनी दरणे यांच्यावर ३ मे रोजी अविश्वास ठराव पारित झाला होता. हा ठराव पारित करताना राष्ट्रवादीसह काँग्रेसनेही शिवसेना- भाजप युतीला सहकार्य केले होते. त्यामुळे नवीन निवडीत दोन पैकी एक पद राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र शिवसेना-भाजप युतीने या दोन्ही पदांवर आपल्या सदस्यांना विराजमान केल्याने राष्ट्रवादीला सव्वादोन वर्षानंतर सत्तेतून ‘आऊट’ व्हावे लागले.
सव्वादोन वर्षांपूर्वी सर्वाधिक २० सदस्य असलेल्या शिवसेनेला सत्तेत प्रवेश करता आला नाही. ऐनवेळी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीने शिवसेनेचे गणित बिघडविले होते. तेव्हापासून शिवसेनेने सभागृहात आक्रमकपणे विरोधी पक्ष म्हणून किल्ला लढविला. मात्र शिवसेना सदस्यांमध्ये सत्तेप्रती सतत अपेक्षा दिसून येत होती. केंद्र व राज्यात युती असल्याने शिवसेनेला जिल्हा परिषदेतही सत्ता खुणावत होती. मात्र सव्वादोन वर्षे त्यांना संधी मिळाली नाही.
अखेर अविश्वास ठरावानंतर शिवसेनेला सत्तेची चव चाखायला मिळाली. शुक्रवारी रिक्त असलेल्या दोन सभापती पदांवर शिवसेना सदस्य गजानन बेजंकीवार आणि कालिंदा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्षांसह काँग्रेस-राकाँ सदस्य गैरहजर
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य स्तरावर शिवसेना-भाजप युती झाल्याने जिल्हा परिषदेच्या राजकारणात उलथापालथ झाली. त्यातूनच राष्ट्रवादीचे मानकर व अपक्ष दरणे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला. त्यासाठी युतीने काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत घेतली. मात्र रिक्त पदांवर सभापतींची निवड करताना युतीने या दोन्ही पक्षांना झटका दिला. राष्ट्रवादीला सत्तेबाहेर पडावे लागले. सध्या युतीसह काँग्रेसही सत्तेत विराजमान आहे. शिवसेना-भाजप आणि काँग्रेसची प्रत्येकी दोन पदाधिकारी सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसले आहे. काँग्रेसने अध्यक्षपद वाचविण्यासाठी अविश्वास ठरावादरम्यान युतीला मदत केली. त्याचे फळही काँग्रेसला मिळाले आहे. मात्र अविश्वासात मदत करूनही राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर पडावे लागले.