नौशाद खान गेल्या दहा वर्षांपासून साकारताहेत सुबक गणेशमूर्ती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 08:25 PM2020-07-28T20:25:46+5:302020-07-28T20:26:21+5:30
धार्मिक विद्वेषाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना येथील नौशाद खान इब्राहीम खान या मूर्तिकाराने धार्मिक ऐक्याची प्रचिती दिली आहे.
अखिलेश अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : श्रद्धेची भावना जात मानत नाही. शहरातील मुस्लीम तरुणाने गणरायाची मूर्ती घडविण्याचा छंद गेल्या दहा वर्षांपासून जोपासला आहे. धार्मिक विद्वेषाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना येथील नौशाद खान इब्राहीम खान या मूर्तिकाराने धार्मिक ऐक्याची प्रचिती दिली.
कला आणि कलावंत यांना जात-पात नसते, हेच नौशादच्या मूर्तीकलेने दाखवून दिले आहे. आपल्या कामातूनच कलावंत परमेश्वराची आराधना करीत असतो. नौशाद खान गेल्या दहा वर्षांपासून गणरायाच्या मूर्ती घडवित आहे. त्यांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींना बाजारात चांगली मागणीही आहे. कारण नौशाद खान पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती घडवितात.
बालाजी वार्डात राहणारे नौशाद खान यांनी बालपणापासून मूर्तीकला जोपासली. हिंदू भावंडांप्रमाणेच ते दरवर्षी लाडक्या गणरायाची आतूरतेने वाट पाहतात. आपल्या हातून तयार झालेली मूर्ती जेव्हा लोक स्थापन करतात, ते पाहून मनाला वेगळाच आनंद मिळतो, असे मूर्तिकार नौशाद खान म्हणतात. जाती-पातीच्या पलिकडे जाणारा हा पुसदचा मूतीर्कार सर्वांसाठी आदर्श ठरला आहे. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे गणेशोत्सवात किंचित परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.