वाघाच्या डरकाळीने नवकारनगर हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2022 10:29 PM2022-11-19T22:29:05+5:302022-11-19T22:29:50+5:30
नवकारनगर परिसरात जितेंद्र पुनवटकर यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या घराच्या ओळीतच आणखी काही घरे थोड्या अंतरावर आहेत. शनिवारी पहाटे ४ वाजताच्यासुमारास या भागात अचानक हलकल्लोळ माजला. पुनवटकर यांच्या घराच्या कपाउंडमध्ये जखमी असलेला राेही भयभीत अवस्थेत जिवाच्या आकांताने ओरडत होता. दुसरीकडे वाघाच्या डरकाळ्याही ऐकू येत होत्या, असे नागरिकांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : भुरकी-रांगणा शिवारात एका तरुणावर वाघाने हल्ला करून त्याला ठार मारल्याच्या घटनेनंतर तालुक्यातील वातावरण प्रचंड भयग्रस्त झाले आहे. शनिवारी पहाटे वणी शहराला अगदी लागून असलेल्या नांदेपेरा मार्गावरील नवकारनगरात एक जखमी अवस्थेत रोही आढळून आला. त्यापाठोपाठ वाघाच्या डरकाळ्याही ऐकू आल्या. त्यामुळे या भागात वाघाचा वावर असल्याची शंका नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
नवकारनगर परिसरात जितेंद्र पुनवटकर यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या घराच्या ओळीतच आणखी काही घरे थोड्या अंतरावर आहेत. शनिवारी पहाटे ४ वाजताच्यासुमारास या भागात अचानक हलकल्लोळ माजला. पुनवटकर यांच्या घराच्या कपाउंडमध्ये जखमी असलेला राेही भयभीत अवस्थेत जिवाच्या आकांताने ओरडत होता. दुसरीकडे वाघाच्या डरकाळ्याही ऐकू येत होत्या, असे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात वणी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच, वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेखर वांढरे, नायक पोलीस शिपाई सचिन मडकाम हे घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पुनवटकर यांच्या घराशेजारी एक रोही जखमी अवस्थेत दिसून आला. तो जोरजोराने ओरडत होता. सूर्योदय होताच नागरिक घराबाहेर निघाले. याबाबत वन विभागाला माहिती दिल्यानंतर राऊंड ऑफिसर राजूरकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या पथकाने या परिसरात वाघाच्या पायाचे ठसे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते दिसून आले नाहीत. मात्र या भागात वाघ फिरत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. मागील आठवड्यातदेखील याच परिसरात वाघाच्या हालचाली दिसून आल्या होत्या. त्यामुळे या वसाहतीच्या जवळच असलेल्या स्वर्णलीला शाळेने विद्यार्थ्यांना एक दिवसाची सुटी दिली होती. एकूणच वाघाच्या अस्तित्वाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
वाघाच्या बंदोबस्तासाठी दोन दिवसांत आढावा बैठक
वाघाचा वाढता वावर लक्षात घेता, नागरिकांच्या तक्रारीवरून वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शनिवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून वाघाचा बंदोबस्त करण्यासंदर्भात तातडीने हालचाली करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत, ना. मुनगंटीवार यांनी येत्या दोन दिवसांत आढावा बैठक घेण्याचे आदेश वन विभागाला दिले आहे. यासाठी अधिकारी वणीत येणार आहेत.