नवरगाव मध्यम प्रकल्प भरलाच नाही, दमदार पावसाची प्रतीक्षा : भूजल पातळी घटणार, पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:46 AM2021-08-24T04:46:21+5:302021-08-24T04:46:21+5:30
तालुक्यात नवरगाव येथे मध्यम प्रकल्प, तर १० ठिकाणी लघु प्रकल्प व बरेचसे पाझर तलाव आहेत. साधारणत: जुलै महिन्यात ही ...
तालुक्यात नवरगाव येथे मध्यम प्रकल्प, तर १० ठिकाणी लघु प्रकल्प व बरेचसे पाझर तलाव आहेत. साधारणत: जुलै महिन्यात ही सर्व धरणे ओव्हरफ्लो होतात. परंतु यावर्षी रिमझिम पडणारा पाऊस पिकांना पोषक ठरत असला तरी भूजल पातळी मात्र वाढवू शकला नाही. त्यामुळे यापुढेही दमदार पाऊस झाला नाही, तर उन्हाळ्यात तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. भूजल पातळी वाढली नसल्याने आजही अनेक शेतातील बोअरवेल जास्त काळ टिकू शकत नाहीत. पावसाळ्यात बोअरवेलची ही स्थिती असल्याने रबी पिकांचा हंगाम धोक्यात येऊन भविष्यात सिंचनाचा प्रश्न बिकट बनणार आहे. याची मोठी झळ शेतकऱ्यांना बसणार आहे. गेल्या तीन वर्षांचा रेकॉर्ड पाहिल्यास हे धरण या कालावधीपूर्वीच १०० टक्के भरले होते. परंतु, यावर्षी मात्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात हे धरण केवळ ६७.०३ टक्केच जलसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली, तर दुसरीकडे तालुक्यातील एकही लघु प्रकल्प अजूनही ओव्हरफ्लो झाला नाही. भविष्यात पावसाने जोर न दिल्यास हे धरण यावर्षी रिकामे राहण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण न वाढल्यास तालुक्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मात्र पुढील कालावधीत एक, दोन दमदार पाऊस झाल्यास यात बदल होऊ शकतो.