दिग्रसमध्ये नवरात्रोत्सवाची धामधूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:14 PM2018-10-11T22:14:47+5:302018-10-11T22:15:06+5:30
शहरासह तालुक्यात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू झाली असून येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे. शक्तीस्वरुपाची अनंत रुपे आहे.
प्रकाश सातघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : शहरासह तालुक्यात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू झाली असून येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे.
शक्तीस्वरुपाची अनंत रुपे आहे. त्यात जगदंबेचे महात्म्य अपार आहे. शहरात स्वयंभू अखंड शक्तीपीठ आहे. हे शक्तीपीठ जिल्ह्यातच नव्हे, तर बाहेर जिल्ह्यातील भक्तांचे आराध्य स्थान आहे. याच रेणुका मातेच्या मंदिरात नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला. परिसरातील भाविकांची मंदिरात मंदियाळी आहे.
शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात रेणुका भवानी मातेचे मंदिर आहे. हे पुरातन मंदिर हेमाडपंथी होते. त्याचे अवशेष आजही कायम आहे. मंदिर एक हजार वर्षापूर्वीचे असावे, असा अंदाज येथे आढळलेल्या शिळावरून बांधण्यात येतो. हरिभाऊ शिंदे यांना एक रेखीव शिळा आढळली. त्यांनी ती शिळा शहरातील कस्तुरे नामक व्यक्तीला दाखविली. ती अश्वमेघ शिळा असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी अश्वमेघ यज्ञ केला जातो, त्याचे स्मरण व्हावे, म्हणून तेथे अशी शिळा ठेवली जाते, असे सांगण्यात येते.
एक शिळा रेणुका मातेच्या मंदिराजवळ सापडली असून ती शिळा महाद्वारातून प्रवेश करताना उजव्या हातावर लावलेली आहे. बाजूला लहान-लहान मूर्त्या आहे. त्यात तुळजापूरची तुळजाई आहे. एक कालभैरवी आणि एक गरूडावरची सुंदर मूर्ती आहे. येथील रेणुका माता तांदळाच्या रुपात असून तिला पिवळा मुखवटा आहे. तीन बाय तिनच्या चौथऱ्यावर ही मूर्ती विराजमान असून हा चौथरा म्हणजे विहीरच आहे.
ही देवी स्वयंभू असून ती विहिरीतूनवर आल्याचे सांगण्यात येते. दत्तात्रेय महाराज हे माहुरला जाताना दिग्रसला भवानी मातेच्या टेकडीखाली बसले होते. त्यांनी एका वृक्षाचा सहारा घेत विश्रांती घेतली. त्यामुळे या टेकडीला ‘दत्ताची टेकडी’ असे म्हटले जाते. दर पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
४0 वर्षांपासून आणली जाते ज्योत
गेल्या ४0 वर्षांपासून देशातील विविध शक्तीपीठातून शहरात आणलेली ज्योत रेणुका मातेच्या मंदिरात प्रज्वलित केली जाते. शहरातील घरोघरी या ज्योतीवरूनच नऊ दिवसाचे नंदादीप प्रज्वलित करण्यात येतात. नवरात्रोत्सवाच्या पर्वावर भवानी मातेच्या दर्शनासाठी भक्तांची पहाटे ४ वाजतापासूनच गर्दी होते. बालक, महिला, पुरुष, युवक, युवती दर्शनासाठी भवानी टेकडीच्या मंदिरात गर्दीचा मेळ घालतात.