दिग्रसच्या रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सव

By Admin | Published: October 16, 2015 02:21 AM2015-10-16T02:21:59+5:302015-10-16T02:21:59+5:30

शक्तीरूपी देवीची अनंत रूपे असून मायारूपाने संपूर्ण सृष्टीवर अधिराज्य गाजविणाऱ्या जगदंबेचे महात्म्य अपार आहे.

Navratri festival of Durgas Renuka Mata Temple | दिग्रसच्या रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सव

दिग्रसच्या रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सव

googlenewsNext

भाविकांची गर्दी : पुरातन हेमाडपंथी मंदिर
प्रकाश सातघरे दिग्रस
शक्तीरूपी देवीची अनंत रूपे असून मायारूपाने संपूर्ण सृष्टीवर अधिराज्य गाजविणाऱ्या जगदंबेचे महात्म्य अपार आहे. सर्व मंगलाचे मांगल्य तिच्या ठायी असून शरण जाणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ती भक्तवत्सल व कृपाळू आहे. दिग्रस शहरातील स्वयंभू शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेणूका माता मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
शहरातीलच नव्हे तर परिसरातील भाविकांची मांदियाळी घटस्थापनेपासून आहे. दिग्रसपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात रेणूका भवानी मातेचे मंदिर आहे. पुरातन मंदिर हेमाडपंथी असून त्याचे अवशेष आजही कायम आहेत. मातेचे मंदिर एक हजार वर्ष पूर्वीचे असावे असा अंदाज येथे आढळलेल्या शिळावरून बांधण्यात येतो. हरिभाऊ शिंदे यांना एक रेखीव शिळा आढळली. त्यांनी ती शिळा शहरातील कस्तुरे नामक व्यक्तीला दाखविली असता ती अश्वमेध शिळा असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून याठिाकणी अश्वमेध यज्ञ केला जात असावा, असे दिसते. यापैकी एक शिळा रेणूकेच्या मंदिराजवळ सापडली असून ती महाद्वारातून प्रवेश करताना उजव्या हातावर लावलेली आहे. बाजूला देवतांच्या लहान-लहान मूर्त्यासुद्धा विराजमान आहेत. त्यामध्ये तुळजापूरची तुळजाई, कालभैरवाची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधते. सभामंडपातील श्री गणेशाची मूर्तीसुद्धा रेखीव आहे. येथील रेणूका माता तांदळा स्वरूपात असून तिला पितळी मुखवटा आहे. तीन बाय तीनच्या चौथऱ्यावर ही मूर्ती विराजमान असून हा चौथरा म्हणजे विहीर होय. ही देवी स्वयंभू असून ती विहिरीतून प्रगटल्याचे सांगण्यात येते. भवानी मातेचा इतिहास पुरातन असल्याचे सांगण्यात येते. दत्तात्रय महाराज माहूरला जाताना दिग्रसच्या टेकडीवरून एका वृक्षाखाली बसून विश्रांती केली. म्हणून या टेकडीला दत्ताची टेकडी असे देखील म्हणतात. रेणूका मातेच्या मंदिराला लागूनच ही भवानी टेकडी आहे. दर पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. गेल्या ४० वर्षांपासून देशातील विविध शक्तीपिठांवरून आणलेली ज्योत रेणूका मातेच्या मंदिरात प्रज्वलित करण्यात येते. शहरातील प्रत्येक घरोघरी या ज्योतीवरूनच नऊ दिवसांचे नंदादीप पेटविले जाते. नवरात्रोत्सवाच्या या पर्वात भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

दिग्रस शहरात भवानी ज्योत प्रज्वलित
दिग्रस येथील दुर्गोत्सवाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे मातेच्या शक्तीपीठावरून प्रज्वलित करून आणली जाणारी भावनी ज्योत होय. विविध मंडळाचे कार्यकर्ते देशभरातील शक्तीपीठावरून सायकलने ज्योत प्रज्वलित करून आणतात. ही ज्योत भवानी माता मंदिरात आणून तेथून ती सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाच्या ठिकाणी नेली जाते. त्याठिकाणी ज्योत प्रज्वलन कार्यक्रमानंतर देवीची स्थापना होते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे सुरू असून विविध मंडळाचे कार्यकर्ते त्यासाठी परिश्रम घेत असतात.

Web Title: Navratri festival of Durgas Renuka Mata Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.