माहूर गडावर नवरात्र उत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:00 AM2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:11+5:30
नवरात्र काळात मंदिरात तेल-तुपाचे अखंड नंदादीप तेवत राहणार असून वैदिक महापूजा, चतुर्वेद पारायण, महाआरती, छबीनाद्वारे मंदिराला प्रदक्षिणा, महाप्रसाद आदीे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. ललित पंचमीला देवीला मौल्यवान वस्त्रालंकारांनी विभूषित करून अलंकार पूजा केली जाणार आहे. रात्री संगीत रजनी होणार आहे. सप्तमीला कुमारीका पूजन, सुहासिनी पूजन करून पूजारी लगतच्या महांकाली गडावर जावून यथासांग पूजाअर्चना करतील. नंतर महांकालीला महावस्त्र अर्पण करून देवीला हवनाचे निमंत्रण देतील.
पुंडलिक पारटकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
माहूर : साडे तीन शक्ती पीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील रेणूका माता मंदिरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. रविवारी विधिवत घटस्थापना करण्यात आली.
संबळ, सनई, चौघडा आदी वाद्यांच्या गजरात देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा नांदेडचे जिल्हा सत्र न्यायाधीश दीपक धोळकिया यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. वेद शाळेचे प्रधानाचार्य नीलेश केदार व त्यांच्या शिष्यांनी पौरोहित्य केले. यावेळी उपाध्यक्ष विलास जाधव, कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वरणगावकर, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, भवानीदास भोगी, श्रीपाद भोपी, विनायक फांदाडे, आशीष जोशी, समीर भोपी उपस्थित होते.
नवरात्र काळात मंदिरात तेल-तुपाचे अखंड नंदादीप तेवत राहणार असून वैदिक महापूजा, चतुर्वेद पारायण, महाआरती, छबीनाद्वारे मंदिराला प्रदक्षिणा, महाप्रसाद आदीे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. ललित पंचमीला देवीला मौल्यवान वस्त्रालंकारांनी विभूषित करून अलंकार पूजा केली जाणार आहे. रात्री संगीत रजनी होणार आहे. सप्तमीला कुमारीका पूजन, सुहासिनी पूजन करून पूजारी लगतच्या महांकाली गडावर जावून यथासांग पूजाअर्चना करतील. नंतर महांकालीला महावस्त्र अर्पण करून देवीला हवनाचे निमंत्रण देतील. अष्टमीला शतचंडी महायज्ञाची देवता स्थापन करून होमहवनास प्रारंभ होईल. नवमीला सतचंडी यज्ञात पूरण पोळीचा नैवद्य व कोहळ्याचा बळी देवून पूर्णाहुती दिली जाणार आहे. दशमीला पुजारी शस्त्र पूजन करून परशुरामाच्या पालखीसह वरदाई पहाडावर जातील. तेथून आणलेले पर्णरूपी सोने माता रेणुकेच्या चरणी अर्पण करतील. यानंतर नवरात्राची सांगता होणार आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त बांधकाम, आरोग्य, परिवहन आदी विभागातील भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. खास बसेस सोडल्या जात आहेत. ठिकठिकाणी आरोग्य शिबिर लावण्यात आले आहे. पोलिसांसह स्वयंसेवक गर्दीला मार्गदर्शन करीत आहे. भाविकांच्या सुविधेची काळजी घेतली जात आहे.
रेणुका मातेची आख्यायिका
पौराणिक दाखल्यानुसार महिष्मार नगरीचा राजा सहस्त्रार्जून जमदाग्नी ऋषींच्या आश्रमात आला. त्याचे ऋषींनी उत्कृष्ट आदरातीथ्य केले. हे बघून राजा आश्चर्यचकित झाला. त्याने व्यवस्था कशी केल्याचे विचारले. त्यावर ऋषींनी आपल्याजवळ इच्छा पूर्ण करणारी कामधेनू असल्याचे सांगितले. ही कामधेनू नेण्यासाठी राजाने बळाचा वापर केला. त्याने जमदाग्नी ऋषींचा शिरच्छेद केला. रेणुका मातेला २१ घाव मारून जखमी केले. मातेची ही अवस्था बघून परशुराम यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा केली. यावेळी माता रेणुकेने सती जाण्याचा संकल्प केला. त्यासाठी परशूरामाला कावडीद्वारे तेथून घेऊन जाण्यास सांगितले. जेथे आकाशवाणी होईल तेथे कावड ठेवण्यास सांगितले. तेथे दत्तात्रय भेटतील व तेच ठिकाण कोरी भूमी (कोणतेही पाप न झालेली जागा) असेल असेही सांगितले. परशूराम कावड घेऊन सह्याद्री पर्वतावर येताच, कावड येथे ठेव, अशी आकाशवाणी झाली. त्याच ठिकाणी दत्तात्रयांच्या पौरोहित्याखाली जमदाग्नी ऋषींवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर रेणुकामाता मुळंदरी येथे सती गेल्या. परशूरामाच्या हाकेमुळे रेणुकादेवी पृथ्वीतून गळ्यापर्यंत वर आल्या. तीच माहूरची रेणुकामाता होय, अशी आख्यायिका आहे.