नवरगाव मध्यम प्रकल्प तुडुंब

By admin | Published: August 1, 2016 12:51 AM2016-08-01T00:51:56+5:302016-08-01T00:51:56+5:30

गेल्या तीन वर्षांपासून १०० टक्के न भरलेला नवरगाव मध्यम प्रकल्प हा जुलै महिन्यात पाण्याने तुडुंब भरला आहे.

Nawargaon Medium Project Tudumba | नवरगाव मध्यम प्रकल्प तुडुंब

नवरगाव मध्यम प्रकल्प तुडुंब

Next

नागरिकांना दिलासा : वणीकरांची वर्षभराची तहान मिटली
वणी : गेल्या तीन वर्षांपासून १०० टक्के न भरलेला नवरगाव मध्यम प्रकल्प हा जुलै महिन्यात पाण्याने तुडुंब भरला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून वणीकरांची वर्षभराची तहान आता मिटली आहे.
येथील नगरपरिषदेने आता स्वस्थ न बसता योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाण्याची गरज भागविण्याच्या स्पर्धेमध्ये नगरपरिषद मागे पडत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वणीकरांची गरज ठरलेला नवरगाव प्रकल्प हा २७ जूलै रोजी १०० टक्के भरल्याची घोषणा पांढरकवडा पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली. या जलाशयाची पातळी २४.१० मीटर एवढी वाढली असून पाणीसाठा १२.४७ द.ल.घ.मी. एवढा झाला आहे. २७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे पाणीसाठा तपासला असता, ५ से.मी.पाण्याचा ओव्हरफ्लो सुरू दिसला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर्षी सर्वांना १० टक्के जादा पाणी देण्याचे ठरविले आहे.
यावर्षी नगरपरिषदेने ४.७० दशलक्ष घ.मी. पाणी वणीकरिता घेतले असून वणी नगरपरिषदेने ८० टक्के पाण्याची परतफेड केली आहे. १० लाख रूपयांचा शेवटचा हप्ता थकीत आहे. राखीव पाण्यासाठी आॅक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात पाणी राखीव करणे गरजेचे झाले आहे. येथील नगरपरिषदेला सध्या या धरणाच्या पाण्याची गरज नसून जिल्हा परिषदेच्या पाण्यानेच काम भागणार आहे. नवरगाव धरणामध्ये यावर्षी जानेवारी महिन्यात फक्त ५१.१४ टक्के पाणीसाठा होता. वणी नगरपरिषद, मारेगाव पाणी वितरण व जिल्हा परिषद ग्रामीण पाणी वितरण या यंत्रणेकरिता हे पाणी आरक्षीत करण्यात आले होते.
यामध्ये वणीसाठी २.२० द.घ.मी., मारेगाव ००.९९ तर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग १.६५ द.घ.मी. पाणी आरक्षीत होते. या तीनही यंत्रणेनी व्यवस्थीत पाणी हाताळले, तर पाणी टंचाई जाणवणार नाही, याबाबत गेल्या १३ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने लक्षात आणून दिले होते. तसेच ९ एप्रिल रोजी ‘नवरगाव धरणात फक्त २५ टक्के जलसाठा’ हे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर निर्गुडा नदीचे खोलीकरण करण्यास सुरूवात झाली व लोकसहभागातून एक महान कार्य करण्यात आले. परंतु वणीची पाणी समस्या कायमस्वरूपी केव्हा मिळणार, वर्धा नदीवरून पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी जोर लावला. परंतु त्याला फारसे यश न आल्याने वर्धा नदीचे पाणी आरक्षीत करण्यासाठी आता जागा उरली नाही. याचे कारण वरोरा जवळील पंमले पॉवर स्टेशनला भरपूर पाणी लागते. त्यामुळे त्याने आपले आरक्षण जाहीर केले आहे. वरोरा शहराची तहान मिटविण्याकरिता पाटाळा या गावाजवळ बंधारा बांधून पाणी आरक्षीत करण्यात आले आहे.
आता समोर पाटाळा, गौराळा, नायगाव ही गावे आहे. त्यासमोर वेकोलीच्या कोळसा खाणी व जुनाडा घाटावर डिफेन्सने मोठा बंधारा बांधला आहे. मात्र वणी नगरपरिषद पाणी आरक्षीत करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू शकली नाही, हु दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे आता वणी शहराला नवरगाव धरणावर अवलंबून राहणे गरजेचे आहे. नगरपरिषदेने मोठी पाईपलाईन टाकून भविष्यासाठी पाण्यावर आपला दावा आत्ताच करणे गरजेचे झाले आहे. याठिकाणी अगदी धरणाच्या मुखावर विहिर आहे. तेथे मोटार बसवून व मारेगावला जाणारी वीज तेथे असल्याने काहीच अडथळा नाही. (प्रतिनिधी)

धरणापासून पाईपलाईन टाकणे गरजेचे
मोठी पाईपलाईन टाकून भविष्याचे पाणी आरक्षीत करणे अत्यंत गरजेचे आहे. वणीची तहान नवरगाव धरण दूर करणार की वर्धा नदी, याचे शासनाकडून समाधान होणे आवश्यक झाले आहे. त्याकरिता वरिष्ठ नेत्यांनी शहराच्या कायमस्वरूपी समस्येवर तोडगा काढावा लागणार आहे. आता नगरपरिषदेची निवडणूक येत्या काही दिवसात होणार असून हा प्रश्न घेऊनच अनेक राजकीय पक्ष निवडणूक लढवतील. निवडून आल्यानंतर हा प्रश्न जो अनेक निवडणुकीमध्ये राजकीय मुद्दा असतो, तो तसाच राहून फक्त आपले पाच वर्ष कसे निघतात, हा मुख्य मुद्दा राहणार आहे.

 

Web Title: Nawargaon Medium Project Tudumba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.