नक्षलग्रस्त ३५ गावे अंधारात
By admin | Published: June 9, 2014 12:10 AM2014-06-09T00:10:13+5:302014-06-09T00:10:13+5:30
विद्युत कंपनीच्या सुस्तावलेल्या कारभाराचा फटका पारवा परिसरातील गावांना वारंवार बसत आहे. थोडाही वारा आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज केव्हा येईल याचा नेम राहात नाही.
अब्दुल मतीन - पारवा
विद्युत कंपनीच्या सुस्तावलेल्या कारभाराचा फटका पारवा परिसरातील गावांना वारंवार बसत आहे. थोडाही वारा आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज केव्हा येईल याचा नेम राहात नाही. गेली अनेक वर्षांपासूनची ही समस्या वीज कंपनीने सोडविली नाही. परिणामी या नक्षलग्रस्त भागातील लोकांना अंधारात रात्र काढावी लागते. याचा पुन्हा अनुभव शनिवारी रात्री आला. रात्री ८.३0 वाजता गूल झालेली वीज रविवारी दुपारी १ वाजता सुरू झाली.
जीवाची काहिली करणार्या उन्हामुळे त्रस्त नागरिकांना रात्रीच्यावेळी थंड हवेची गरज आहे. परंतु वीज पुरवठाच खंडित झाल्याने डासांचा प्रादुर्भाव आणि घामाच्या धारा झेलत तब्बल ३५ गावातील नागरिकांना रात्र काढावी लागली. परिसरात शनिवारी वादळ-वारा नसतानाही वीज पुरवठा खंडित का झाला, हा न समजणारा प्रश्न होता. एरवी थोड्याही वार्याने वीज खंडित होते.
या भागातील वीज तारा लोंबकळणार्या आहे. त्यामुळे विद्युत कंपनी कुठलीही जोखीम न स्वीकारता वीज पुरवठा खंडित करते. परंतु कायमस्वरूपी उपाय शोधला जात नाही. नागरिकांनी कित्येकदा तक्रारी केल्यानंतरही कंपनीला जाग येत नाही. मोर्चे, आंदोलने केल्यानंतरही समस्या निकाली काढली जात नाही. या समस्येने नागरिकांना भंडावून सोडले आहे. आठवड्यातून कित्येकदा वीज पुरवठा खंडित होतो. या भागात भारनियमन नसले तरी त्यापेक्षाही मोठी शिक्षा खंडित वीज पुरवठय़ाच्या रूपाने भोगावी लागत आहे.
या भागातील बहुतांश गावे जंगलालगत आहे. टिपेश्वर अभयारण्य काही अंतरावर आहे. वन्य जीवांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. जनावरे ठार करण्यात आली. अशा स्थितीत परिसरातील वीज पुरवठा खंडित होवू नये, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
परिसरात सिंगल फेज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना अखंडित वीज मिळावी. ही उपाययोजनाही नियोजन आणि उदासीनतेमुळे फेल ठरली आहे. याशिवाय नागरिकांना वापरापेक्षा जादा युनिटचे बिल दिले जाते. तक्रारी केल्यानंतरही हा प्रश्न निकाली काढला जात नाही. घाटंजी येथे असलेल्या कार्यालयात जावून बिलात दुरुस्ती करून आणा, असा आदेश दिला जातो. या प्रकारात वीज ग्राहकांचा वेळ आणि पैसा खर्ची जातो. चूक विद्युत कंपनीची आणि भुर्दंंड मात्र ग्राहकांना बसतो. या समस्येचा ससेमीरा चुकविता चुकविता नागरिकांना नाकीनऊ येत आहे.