नयनतारा तू जर आली असती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:33 PM2019-01-12T22:33:50+5:302019-01-12T22:34:20+5:30
संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर होणाऱ्या या कविसंमेलनावरही बहिष्काराचे सावट होते. अनेक निमंत्रित कविंनी सोशल मीडियावरुन बहिष्कार जाहीर केला होता. पण निम्म्यापेक्षा अधिक कवी व्यासपीठावर असल्याने अपेक्षेप्रमाणे कविसंमेलन रंगत गेले.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) :
इथल्या विधवांच्या कपाळावर ज्यांनी कोरलं वैधव्य, त्यांना कशी चपराक बसली असती,
नयनतारा तू जर आली असती
देश स्वतंत्र झाला सत्तेच्या समीकरणात
गुलामीच्या मानसिकता घट्ट झाल्या
तसेच पुरूषत्व षंढ झाले
माणुसकीचे उभे धिंगाणे झाले
‘कोणी चोर कोणी शिरजोर’ या कुसूम अलाम यांच्या कवितेने उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले.
शायर भाऊसाहेब पाटणकर परिसरातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर शुक्रवारी रात्री मान्यवरांचे कविसंमेलन रंगले. यावेळी राज्यभरातून आलेल्या ४५ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे विलास वैद्य होते.
कुसूम अलाम यांनी जोहान्सबर्गमधील जागतिक परिषदेत महिला या विषयावर मत मांडले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनीही आपल्या भाषणात त्यांच्या लेखनाचा आणि कवितेचा उल्लेख केला होता. अशावेळी अलाम यांनी कविसंमेलनातही ‘नयनतारा’ सादर करून सर्वांना अंतर्मुख केले. साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत रंगलेले कविसंमेलन रसिकांसाठी मेजवानी ठरले.
समजू नको ढगा हे साधेसुधे बियाणे
मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे
निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी कविता यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यांतर्गत येणाºया पोहंडूळ येथील कवी, गझलकार आबेद शेख यांनी सादर केली.
पाजून सत्तेस सांगा आज केले तुल कोणी,
काय चलनाची गुलाबी ही दिली का भूल कोणी
या गझलेने सत्ताधाºयांचा खरा चेहराच उघड केला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कविसंमेलनाने प्रचंड गर्दी खेचली, खिळवून ठेवली. अनेक कवितांना ‘वन्स मोअर’ मिळाला.
शेतकरी आत्महत्या आणि सध्याची सामाजिक स्थिती बहुतांश कवींच्या रचनांमधून डोकावताना दिसली. परळी वैजनाथ (बिड) येथील अरुण पवार यांनी मायबापाचे होणारे हाल मांडले.
वायले राहिले मुलं, दोघांची वाटणी
माय परसात, बाप गोठ्याचा धनी
या त्यांच्या रचनेने टाळ्यांची दाद मिळविली. अकोल्याचे कवी प्रशांत असनारे यांनी मुक्तछंदातून ‘माणूस’ टिपला.
देव म्हणाला,
तुला काहीच कसं जमत नाही
जा! तू माणूस हो
तेव्हापासून मी हा असा
माणूस म्हणून जगतोय
या कवितेवर त्यांनी रसिकांची दाद मिळविली. हिंगोलीचे विलास वैद्य यांच्या अध्यक्षतेत रंगलेल्या कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन योगीराज माने यांनी केले. अभय दाणी यांनी भौतिक विश्वात माणसाचे स्वत:शी चाललेले युद्ध आपल्या कवितेत मांडले.
या दिवसभराच्या पेटलेल्या हातांनी मी
तुझा मेणाचा पुतळा उभा केला रात्रीतून तर
तू सकाळी हा राजतिलक लावलास माथ्यावर माझ्या
मी घोड्यावर बसून
पुन्हा युद्धभूमीवर
संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर होणाऱ्या या कविसंमेलनावरही बहिष्काराचे सावट होते. अनेक निमंत्रित कविंनी सोशल मीडियावरुन बहिष्कार जाहीर केला होता. पण निम्म्यापेक्षा अधिक कवी व्यासपीठावर असल्याने अपेक्षेप्रमाणे कविसंमेलन रंगत गेले. चंद्रपूरच्या माधवी भट यांनी ‘गंगार्पण’ ही गझल सादर केली.
इथे तू जगावे, तुला तू मिळावे
तुझा दीप पात्रात, मी सोडला
पुण्याच्या अपर्णा मोहिले, विनोद बुरबुरे, विद्धार्थ भगत, नीलकृष्ण देशपांडे, नितीन नायगावकर आदींनी आपल्या कवितांमधून रसिकांची मने
जिंकली.