राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी

By admin | Published: December 29, 2016 12:29 AM2016-12-29T00:29:33+5:302016-12-29T00:29:33+5:30

नगरपरिषदेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने सत्ता स्थापनेबाबत शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.

NCP and Congress' lead | राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी

राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी

Next

पुसद नगरपरिषद : काँग्रेसला स्वीकृत सदस्य व सभापतिपदाची अपेक्षा
पुसद : नगरपरिषदेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने सत्ता स्थापनेबाबत शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये आघाडी झाल्याने सत्ता स्थापनेचे तर्कवितर्क संपले असून काँग्रेसला आता एक स्वीकृत सदस्य व बांधकाम सभापतिपद मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
पुसद नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. २७ नोव्हेंबरला नगरपरिषदेची निवडणूक होवून २८ नोव्हेंबरला मतमोजणी झाली. तब्बल ६५ वर्षानंतर नगराध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा नाईक घराण्याकडे आली. यापूर्वी १९४६ ते १९५२ या कालावधीत राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे नगराध्यक्ष म्हणून थेट जनतेतून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांच्याच स्रुषा अनिताताई मनोहरराव नाईक या थेट जनतेतून निवडून येवून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. पुसद नगरपरिषदेंतर्गत एकूण १४ प्रभागातून २९ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादीचे १२, काँग्रेसचे तीन, भाजपाचे दहा व शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी किमान १५ नगरसेवक आवश्यक असल्याने व कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने त्रिशंकू अवस्थेत नेमके काय घडणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना काँग्रेसच्या त्या तीन नगरसेवकांवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र अखेर सर्व सुंदोपसुंदीवर पडदा पडला असून काँग्रेसचे तीन नगरसेवक व राष्ट्रवादीचे १२ असे मिळून १५ नगरसेवकांची आघाडी झाली. यामध्ये काँग्रेसला एक नगरसेवक व बांधकाम सभापती मिळणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद, पाणीपुरवठा, आरोग्य आणि महिला बालकल्याण सभापती आदी पदे मिळणार असल्याचे कळते. याबाबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष लवकरच सर्व नगरसेवकांची पहिली सभा बोलावतील व त्यामध्ये या सर्व बाबींचा खुलासा होईल. मात्र प्रशासनाच्या पत्रानुसार व विद्यमान नगराध्यक्षांचा कार्यकाळ २७ डिसेंबर रोजी संपल्याने नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांनी अधिकृतपणे पदाचा कार्यभार स्वीकारला.
(लोकमत चमू)

Web Title: NCP and Congress' lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.