यवतमाळ, उमरखेडवर राष्ट्रवादीचा दावा

By Admin | Published: July 27, 2014 12:18 AM2014-07-27T00:18:16+5:302014-07-27T00:18:16+5:30

काँग्रेसने २००४ च्या निवडणुकीचा आधार घेऊन लोकसभेचे जागा वाटप केले होते. हाच निकष लक्षात घेतल्यास आता राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. शिवाय लोकसभेत काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा

NCP claims Yavatmal, Umarkhed | यवतमाळ, उमरखेडवर राष्ट्रवादीचा दावा

यवतमाळ, उमरखेडवर राष्ट्रवादीचा दावा

googlenewsNext

यवतमाळ : काँग्रेसने २००४ च्या निवडणुकीचा आधार घेऊन लोकसभेचे जागा वाटप केले होते. हाच निकष लक्षात घेतल्यास आता राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. शिवाय लोकसभेत काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा राज्यात राष्ट्रवादीने मिळविल्या आहे. याच निकषावर विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप व्हावे, अशी पक्षाची भूमिका आहे. यवतमाळ व उमरखेड विधानसभेबाबत स्थानिक कार्यकर्ते आग्रही आहेत. त्यांची हीच भूमिका पक्षश्रेष्ठींपुढे ठेवून या मतदारसंघासाठी दावा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय निर्धार मेळाव्याला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. २००४ आणि २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत संधी हुकलेल्या मतदारसंघावर राष्ट्रवादी प्राधान्याने दावा करणार आहे. यवतमाळ जिल्हयतील केवळ एकमेव विधानसभा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. आणखी तीन मतदारसंघ देण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी लावून धरली आहे. याही मुद्यांचा विचार आघाडीतील जागा वाटपात करण्यात येणार आहे. आघाडीबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे मांडली आहे. आघाडी सन्मानपूर्वक व्हावी, अशी मागणीही आहे. या बाबत अंतिम निर्णय पक्षनेते शरद पवार घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ आॅगस्टनंतर केव्हाही आचारसंहिता लागणार असल्याची शक्यता या पत्रपरिषदेत वर्तविली. जागा वाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. राष्ट्रवादीला जागा वाढवून दिल्यानंतरच हे सूत्र ठरणार आहे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिली.
राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा
राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस कमिटीचा निर्धार मेळावा येथील बलवंत मंगल कार्यालयात पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विधानसभेत काँग्रेससोबत आघाडी कायम राहणार असून जागा वाढविण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. विधानसभेत राष्ट्रवादीच्या वाट्याला अधिक जागा निश्चितच येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. लोकसभेत जे आक्रित घडले ते विधानसभेत थोपविण्यासाठी कामातून जनतेला आपलसं करा, बोलत असताना भान ठेवा, बेरजेच राजकारण करा, चुकलेल्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निर्धार मेळावा आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसने पाच वर्षात राष्ट्रवादीला अन्यायपूर्वक वागणूक दिली. प्रामाणिकपणे काम करूनही सन्मान मिळाला नाही. यापुढे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, महिला व बालकल्याण सभापती प्राजक्ता मानकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार प्रकाश गजभिये, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, नगराध्यक्ष सुभाष राय, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष मानकर, वसंतराव घुईखेडकर, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, सुरेश लोणकर, उत्तमराव शेळके, जनाब इनायतुल्ला खान आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: NCP claims Yavatmal, Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.